जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीर हुतात्मांच्या स्मरणार्थ शिल्प
जालना/प्रतिनिधी,दि.20
मराठवाडा अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीर हुतात्मांच्या स्मरणार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पे तयार करण्यात आली आहेत. या शिल्पांचे राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा पालकमंत्री अतुल मोरेश्वर सावे यांच्या हस्ते दि.17 सप्टेंबर 2024 रोजी उद्घाटन करण्यात आले.
शिल्पांची वैशिष्टे म्हणजे यात निजामी राजवटीत जनतेवर होणारे अन्याय, अत्याचार, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील जनतेने उभा केलेला स्वातंत्र्य लढा, मराठवाड्यातील विशेषतः जालना जिल्ह्यातील दगडाबाई शेळके, जर्नादन मामा यांचे योगदान समाविष्ट आहे. दगडाबाई शेळके यांनी भोकरदन तालुक्यातील कोलते टाकळी येथील निजामाच्या कॅम्पवर केलेला बॉम्ब हल्ला, त्या दोघांचे शिल्प, मराठवाड्यातील लढ्याचे इतर काही प्रसंग तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या पोलिस कारवाईनंतर निजामाने पत्करलेली शरणागती व मराठवाडा स्वतंत्र भारतात विलिनीकरण आदिचे चित्रण या शिल्पांमध्ये करण्यात आलेले आहे. एकंदरीत सर्व शिल्पातून मराठवाडा मुक्ती संग्रामातील जालना जिल्ह्यातील हुतात्माच्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
मुक्तीसंग्रामाची शिल्पे ही शिल्पकार नरेंद्र साळुंखे यांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. कार्तिक गावडे आणि प्रा.कृष्णा नागवे यांच्या सहकार्यातून जिल्हाधिकारी कार्यालय सामान्य प्रशासन विभागामार्फत तयार करण्यात आले आहेत. असे तहसीलदार (सामान्य), जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.