शंभर वर्षाची परंपरा लाभलेला कुंडेगाव कोळीवाडा येथील हरीनाम सप्ताह.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.26
जसे जसे कृष्णाअष्ट्मी, गोपाळकाला सण जवळ येतात तसे तसे उरण मधील भाविक भक्तांना हरीनाम सप्ताहाची ओढ लागते. कारण श्रीकृष्ण जयंतीच्या सहा दिवस अगोदर उरण मध्ये अनेक ठिकाणी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. अखंड हरीनाम सप्ताह मध्ये भजन, कीर्तन, भक्ती गीत गायन, महाप्रसाद, आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.उरण मधील नवघर ग्रामपंचायत हद्दीतील कुंडेगाव कोळीवाडा येथेही हरीनाम सप्ताहचे दरवर्षी उत्साहात आयोजन करण्यात येते. कुंडेगाव कोळीवाडा येथे हरिनाम सप्ताह साजरा करण्याची गावाला १०० वर्षाची ऐतिहासिक व धार्मिक परंपरा आहे. उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायत हद्दीतील कुंडेगाव कोळीवाडा येथे वर्षानुवर्षे हरीनाम सप्ताह चालत आलेला आहे. यंदा २० ऑगस्ट २०२४ रोजी कुंडेगाव कोळीवाडा येथे हरीनाम सप्ताह चालू झाले असून २६ ऑगस्ट २०२४ रोजी या हरीनाम सप्ताहची सांगता झाली आहे.दरवर्षी
सप्ताहात सहभागी होणारे भाविक भक्त,विविध देणगीदार, सल्लागार मंडळ, अखंड हरीनाम सप्ताह कमिटी, पंच कमिटी, व्यवस्थापक मंडळ, ग्रामस्थ मंडळ यांच्या सहकार्याने कुंडेगाव कोळीवाडा येथे हरिनाम सप्ताह पार पडला जातो.यंदाचे हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष काशिनाथ पाटील, सचिव रत्नाकर पाटील, सचिव महावीर पाटील, तसेच सल्लागार मंडळ, पंच कमिटी, व्यवस्थापक मंडळाचे पदाधिकारी सदस्य, ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.