सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरु
जालना/प्रतिनिधी,दि.8
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहे चालविली जातात. मागासवर्गीयांची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नती तसेच त्यांचे राहणीमान, समाजातील इतर घटकांप्रमाणे त्यांना जीवन जगता यावे तसेच, त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण व उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासकीय वसतीगृह योजना सुरू करण्यात आली आहे. तरी जालना जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून संबंधित गृहपालाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
जालना जिल्ह्यातील जालना, भोकरदन, अंबड व मंठा येथे मुलींचे व जालना, बदनापुर, अंबड, भोकरदन, घनसावंगी येथे मुलांचे असे एकुण 10 शासकीय वसतिगृहे शासकीय इमारतीत कार्यान्वीत आहेत. या वसतिगृहामध्ये मुलींची 355 व मुलांची 500 असे एकुण 855 विद्यार्थी संख्या मान्यता आहे. शासकीय वसतिगृहामध्ये इयत्ता आठवीच्या वर्गापासून प्रवेश देण्यात येतो. शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत निवास व्यवस्था, भोजन, शैक्षणिक साहित्य व इतर सोयी-सुविधा पुरविल्या जातात. शासकीय वसतिगृहामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग यांच्याकरिता प्रवर्गनिहाय जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. शासकीय वसतिगृहातील रिक्त जागेवर गुणवत्तेनुसार, प्रवर्गनिहाय व आरक्षणानुसार प्रवेश दिला जातो. जालना जिल्ह्यातील खालील 10 शासकीय वसतिगृहामध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाचे शालेय विद्यार्थ्यांनी 10 जुलैपर्यंत, कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व बिगर व्यावयायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे अर्ज दि. 31 जुलै 2024 पर्यंत करावेत. असेही सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.