निंभार्णी ते राजुरवाडी रस्त्याचे काम चार महिन्यांपासून रखडलेलेच

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.27
मोर्शी : मोर्शी तालुक्यातील निंभार्णी ते राजुरवाडी या रस्त्याचे काम जवळपास चार महिन्यांपासून रखडले आहे. रस्त्यावरील खडी आणि कच उघडी पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. खडीवरून घसरून अपघात होत आहेत. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.तिवसा ते मोर्शी या मार्गाचे काम नाबार्डमधून पूर्ण झाले आहे. मात्र, निंभार्णी रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्यासाठी अर्थसंकल्पातून निधी मंजूर झाला आहे.रस्त्यावर फक्त खडी टाकली गेली आहे. पक्का रस्ता करून डांबरीकरण पूर्ण करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. कित्येक दिवसांपासून रस्ता पूर्ण होत नसल्याने स्थानिक वाहनचालकांनी तातडीने नाराजी व्यक्त केली आहे. मोर्शी तालुक्यातील प्रवाशांना मधला मार्ग म्हणून हा रस्ता उपयोगी पडतो. अनेक विद्यार्थीही या मार्गाने ये-जा करतात.त्यामुळे रस्त्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेल्याच महिन्यात आमदार राजेश वानखडे यांनी या मार्गाने प्रवास केला होता. जूनपासून पाऊस सुरू होणार असल्याने पुन्हा रस्त्याच्या कामाला विलंब होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.