भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी तालुकास्तरावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जालना/प्रतिनिधी,दि.09
इयत्ता अकरावी व बारावी तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या ज्या विद्यार्थ्याना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना भोजन,निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाहभत्ता व इतर आवश्यक सुविधावर खर्च करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू केली आहे. विद्यार्थ्याचे उशीरा सुरू होणारे सत्र तसेच सदर योजनेचा विस्तार तालुकास्तरापर्यंत वाढविल्याने अर्ज करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. 15 जानेवारी 2025 पर्यत वाढविण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यानी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मुदतीत सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
स्वाधार योजनेअंर्तगत तालुका नगरपंचायत, नगरपालिका हद्दीपासून 5 किलोमिटरच्या आत असलेल्या महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी व बारावी तसेच बारावीनंतर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याना शासन निर्णयानुसार देय असलेली रक्कम मंजुर केली जाते.सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रूपये 2.50 लाखाच्या आत असणे अपेक्षीत आहे. अनूसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून सदर योजनेचा विस्तार तालुकास्तरावर करण्यात आलेला आहे . विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या, तालुक्याच्या ठिकाणी आहे. अशा शहरातील तसेच तालुक्यातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यास दहावी, अकरावी व बारावी या अभ्यासक्रमात किमान 50 टक्के गुण असणे अपेक्षीत आहेत. तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दिव्यांगासाठी 40 टक्के गुण असणे अपेक्षीत आहे. या विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 75 टक्के असणे अपेक्षीत आहे. सन 2024-25 या वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईनद्वारे भरण्यात येत आहे. यापुर्वी दिलेल्या विहित मूदतीमध्ये ज्या पात्र विद्यार्थ्यानी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईनद्वारे अर्ज केले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करु नये. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.