जिल्ह्यात २२ ते २८ जुलैदरम्यान साजरा केला जाणार ‘शिक्षण सप्ताह’
जालना/प्रतिनिधी,दि.19
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक शाळांत २२ ते २८ जुलै दरम्यान ‘शिक्षण सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची सूचना शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक शाळांना दिली असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त २२ ते २८ जुलै या कालावधीत ‘शिक्षण सप्ताह’ साजरा करण्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणारा आहे. २२ जुलै रोजी अध्ययन, अध्यापन साहित्य दिवस, २३ जुलै रोजी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता, २४ जुलै रोजी क्रीडा दिवस, २५ जुलै रोजी सांस्कृतिक दिवस, २६ जुलै रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम, २७ जुलै रोजी मिशन लाइफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम, शालेय पोषण दिवस, २८ जुलै रोजी समुदाय सहभाग दिवस साजरा करण्याच्या सूचना तालुक्यातील सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत.
————————————————————-
सर्व शाळांनी शिक्षण सप्ताह साजरा करावा
शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार तालुक्यातील सर्व शाळांना शिक्षण सप्ताह साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या प्रमाणे २२ ते २८ जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा केला जाईल. – क्षीरसागर डी. एन.गटशिक्षणाधिकारी, बदनापूर