मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मंगलताईंना मिळाला आधार…

जालना/प्रतिनिधी,दि. 20
मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान असलेला जालना जिल्हा. याच जिल्ह्यातील अंबड तालुक्यात चुरमापुरी हे एक छोटेसे खेडेगाव आहे. चुरमापूरी येथील मंगल रामभाऊ बोडखे ही महिला स्वत:च शेतमजूरी व घरचे काम करत संसाराचा गाडा ओढत असते. श्रीमती बोडखे यांचे शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झालेले आहे. तसेच पती रामभाऊ बोडखे हे सतत आजारी असल्याने ते गावातच छोटीसी पिठाची गिरणी चालवून आपल्या संसाराला हातभार लावत उदरनिर्वाह करत असतात. त्यांच्या परिवारात त्यांना मुलगा नसून 6 मुलीच आहेत. त्यापैकी 5 मुलींचे लग्न झाले असून त्या त्यांच्या संसारात खुश आहेत. तर सर्वांत लहान मुलगी ही अविवाहीत असून ती सध्या शिक्षण घेत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यावर दर महिना 1500 रुपये येणार असल्याची बातमी त्यांना भ्रमणध्वनीद्वारे मिळाली. आजूबाजुच्या सुशिक्षीत महिलांकडून त्यांना वारंवार नारी शक्ती ॲपवर अर्ज केला का मावशी अशी विचारणा होवू लागली. त्यांनी नाही म्हणून सांगितले. त्यानंतर त्यांच्या थेट घरीच अंगणवाडी सेविका पोहचल्या त्यांनी मला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी सविस्तर माहिती देवून सर्व कागदपत्रे जमवाजमव करण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत घरी येवून अंगणवाडी सेविकेने त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज यशस्वीरित्या ऑनलाईन भरला. त्यामुळे अर्ज करतेवेळी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही व वेळेत अर्ज दाखल झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. आर्थिक अचडणीच्या काळात पैशांची अत्यंत निकड असतानाच ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंगल रामभाऊ बोडखे यांच्या खात्यावर 3 हजार रुपये जमा झाले असल्याचा भ्रमणध्वनीवर संदेश आला असल्याचे त्यांच्या लहान मुलीने त्यांना सांगता क्षणीच त्यांना खुप आनंद झाला. त्याचवेळी प्रथमत: रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचे ऐकुन बंधूराया मुख्यमंत्री दादा असे शब्द उच्चारत आकाशाकडे पाहून हात जोडत मनापासून आभार मानले. रक्षाबंधनानिमित्त आपणास उत्कृष्ट भेट मिळाली असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त करत गावातील इतरही महिलांना त्यांनी आपल्या खात्यावर पैसे जमा झाल्याची आनंदाने बातमी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंगल रामभाऊ बोडखे यांच्या खात्यावर पहिल्याचवेळी 3 हजार रुपये जमा झाले असल्याने त्यांनी या पैशातून गृह उपयोगी साहित्य तसेच किराणा सामानाची खरेदी करत आपल्या उदरनिर्वाहाचा गाडा पुढे चालू ठेवला आहे. या योजनेमुळे त्यांना अत्यंत मोलाची मदत होत असल्याचेही त्यांनी सांगितले. घर, संसारातील निकडीच्या वस्तु, पदार्थ तसेच मुलीचे शिक्षण आणि वारंवार आजारी राहणाऱ्या पतीचा औषधांचा खर्च मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशातून त्या करत असल्याचेही त्यांनी सांगितले. मध्यंतरीच्या काळात गावात लाडकी बहीण योजना बंद पडणार अशी अफवा पसरली होती त्यावेळी मनात नुसती बैचेनी सुरु असल्याने फार घुसमट झाली असे सांगून भविष्यातही ही योजना चालू रहावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. तुच आमच्या गोरगरिबांचा पाठिराखा मुख्यमंत्री दादा….असे म्हणत पुन्हा आकाशाकडे पाहुन दोन्ही हात जोडत महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार मानले.