राष्ट्रसंतांच्या भजनांनी तरुणांना स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरित केले:लोक-कलावंत प्रमोद पोकळे यांचे प्रतिपादन, विचोरीत ग्रामजयंती कार्यक्रम उत्साहात,

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.22
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या युगातील दूरदृष्टीचे थोर विचारवंत होते. म्हणूनच त्यांनी केवळ मंदिरात पूजाअर्चा करत बसण्यापेक्षा कर्तव्याला महत्त्व दिले. मुळात त्यांचा जन्मच पारतंत्र्याच्या काळात झाल्याने देशाला परकीय जोखडातून मुक्त करण्यासाठी त्यांनी राष्ट्रभक्तीपर शेकडो भजने गाऊन तरुणांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सामिल होण्यास प्रेरित केले. देश-विदेशात भारतीय धर्म-संस्कृतीचा झेंडा फडकवला, असे प्रतिपादन लोक-कलावंत प्रमोद पोकळे यांनी केले.मोर्शी तालुक्यातील विचोरी गावात श्रीराम नवमी, हनुमान जन्मोत्सव व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची ११६ जयंती नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित जिल्हा खंजिरी भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या वेळी सुखदेव गोंडेकर, डॉ. राजेश ठाकूर, देशमुख, महेश राऊत, पंजाबराव वानखडे व अशोक रुमणे उपस्थित होते.प्रमोद पोकळे म्हणाले, की मंदिरी बसून देव-देव करत बसण्यापेक्षा ग्रामस्वच्छतेला व दुःखीतांना आधार देण्यात राष्ट्रसंतांनी धन्यता मानली. ग्राम उत्थानासाठी व समाज-सेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातल्याने ते खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत ठरले, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन आनंद किर्तकार यांनी केले.कार्यक्रमासाठी शरद वांगे, दिलीप गाढवे, विनोद वांगे, प्रदीप देवळे, विलेश वांगे, ज्ञानेश्वर देशमुख, सुरेश धोटे, सुरेंद्र भुजाडे, प्रज्ज्वल वांगे, प्रज्ज्वल हिरडे आदींनी परिश्रम घेतले.