नेरपिंगळाई शेतशिवारातील उभ्या पिकांत रानडुकरांचा हैदोस वाढला:शेतकऱ्यांच्या पिकांचे होतेय नुकसान

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.2
मोर्शी – नेरपिंगळाई अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांना समोर जावे लागत असून, त्यांच्यावरील संकटाची ही मालिका सुरूच आहे. आता शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या हैदोसाला सामोरे जावे लागत आहे. मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई परिसरातील अनेक भागात रानडुकरांच्या हैदोसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतातील उभी पिके उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे. परिसरातील शेत शिवारात रानडुकरे धुमाकूळ घालत पिकांची नासाडी करत आहेत. रानडुकरांच्या कळपाने नेरपिंगळाई शिवारात काढणीला आलेल्या हरभऱ्यासह गव्हाचेही नुकसान करत आहेत. असाच प्रकार सुरेश नारायण मोहेकर यांच्या शेतात घडला. रानडुकारांनी त्यांच्या शेतातील काढणीला आलेल्या अर्ध्या एकरातील गहू जमीनदोस्त केला. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्यावर डोक्याला हात मारून घेण्याची वेळ आली आहे. रानडुकरांसह रोही व हरीण यांचे कळप येतात आणि शेतातील पिकांची नासाडी करत शिवराशिवारांनी निघून जातात. वन विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन या रानडुकरांचा बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्याना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. आधीच हवामानातील बदलामुळे शेतीचे नुकसान झाले असून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहे. अशात हे वन्यप्राणीही शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या प्राण्यांना पिटाळून लावण्यासाठी, डोळ्यात तेल टाकून रात्रभर शेतकरी शेतात जागून उभ्या पिकाचे संरक्षण करत असल्याचे दिसून येत आहे. ठोस उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी : शेतात ठिकठिकाणी हे वन्य प्राणी धुडगूस घालत असून त्या ठिकाणचा गहू, हरभरा जमीनदोस्त करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे नुकसान केलेले पीक एक टक्काही कामी येत नाही. वन्य प्राण्यांचा अटकाव करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्या सगळ्या कुचकामी ठरत आहेत. वन्यप्राणी शेतमाल मातीमोल करतात व शेतकऱ्याला त्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याखेरीज दुसरा पर्याय नसतो. हे दुष्टचक्र कधी थांबेल हेच शेतकऱ्यांना कळेनासे झाले एकतर रानडुकरांना वन विभागाने मारू टाकावे किंवा शेतकऱ्याला मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहे. रानडुंकरांमुळे कुठलीही वन्यजीवांची साखळी तुटणार नसल्याने मोठ्या प्रमाणात संख्या असलेल्या रानडुकरांना ठार मारावे किंवा त्याची संख्या तरी नियंत्रित करावी, अशी मागणी या निमित्ताने शेतकरी करत आहे.वन्यप्राणी हिरावताहेत हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वन्य प्राणी पिकांची नासधूस करून हिसकावून घेत आहे. रानडुकरे, रोही, हरीण आदी वन्य प्राण्यांचा शेतमालाला व पिकाला मोठ्या प्रमाणात त्रास आहे. वन्यप्राणी शेतपिकांचे भरून न निघणारे नुकसान करतात. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. नुकसानीच्या भीतीपोटी हरभऱ्याऐवजी पेरला गहू रानडुकरांचा त्रास गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याला जास्त होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा लावण्याची इच्छा असूनही नाईलाजाने गहू लावला. परंतु शेतकऱ्यांचा तो केवळ भ्रमनिरास ठरला. रानडुकरे व रोह्यांनी गव्हालाही सोडले नाही. गहू पिकाचेही या वन्यप्राण्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. रानडुकरांनी काढणीला आलेला गहू उद्धवस्त केल्याने हवालदिल शेतकरी.