महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समक्ष ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी 2 ऑगस्टपासून सुरु
जालना/प्रतिनिधी,दि.2
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व भारत ईलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याकडील तज्ञ अभियंताकडून 3984 बॅलेट युनिट, 2229 कंट्रोल युनिट आणि 2404 व्हीव्हीपॅट यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी म्हणजेच एफ एल सी दि. 2 ऑगस्ट 2024 पासून सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत 1 हजार 755 मतदान केंद्रे आहेत. तर जिल्ह्यात वापरा योग्य ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्राची संख्या पुढीलप्रमाणे आहे. यात सी.यु.3180, बी.यु. 5633, व्ही व्ही पॅट 3204 भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एकूण मतदान केंद्रांच्या 127 टक्के सी.यु. म्हणजेच 2229 तर 227 टक्के बी.यु. म्हणजे 3984 व 137 टक्के व्हीव्हीपॅट यंत्र म्हणजे 2404 ईव्हीएम व्हीव्ही पॅट यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी दि.2 ऑगस्ट 2024 पासुन भारत ईलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याकडील तज्ञ इंजिनिअर्सकडून तसेच जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समक्ष महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे जुना मोंढा या ठिकाणी केली जाणार आहे.
एफ.एल.सी. या प्रक्रियेत प्रत्येक कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट मशिन्स एकमेकांस जोडून त्यांची तपासणी भारत निवडणूक आयोगाने नेमणूक केलेले तज्ञ इंजिनिअर्स करतात. यात कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट मध्ये तांत्रिक बिघाड नाही अशा मशिन्सला एफ एल सी ओके असे स्टिकर लावून सुरक्षित ठेवले जाईल तर ज्या कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट यापैकी तांत्रिक बिघाड आहे. अशा मशिन्सवर एफ एल सी रिजेक्टेट असे स्टिकर लावून या मशिन्स सुरक्षित ठेऊन भारत निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर तांत्रिक बिघाड असलेल्या या मशिन्स कंपनीकडे पाठवण्याची कार्यवाही केली जाईल. या प्रक्रिया महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सहा टेबलवर राबविली जाणार आहे. यात दर दिवशी भारत निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले 6 अभियंता पार पाडतील. सदरील प्रक्रिया होत असतांना या पूर्ण प्रक्रियेचे लाईव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार असून ही प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व निगरानीखाली पार पाडली जाणार आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.