शिवसंकल्प समालोचक असोसिएशन तर्फे स्व.गोपाळ वर्तक यांच्या स्मृती प्रित्यर्थ विकलांग व्यक्तीस सायकल प्रदान.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.28
केवळ समालोचन आणि निवेदनातून समाज प्रबोधन हेच न करता मिळालेल्या मानधनातील काही रक्कम असोसिएशन कडे जमा करून सामाजिक बांधिलकी जोपासून सामाजिक उपक्रमातून समाजातील गरीब आणि गरजूंना जी काही मदत करता येईल ती करण्याचा संकल्प घेऊन रायगड मधील नामवंत निवेदक रायगडभूषण नितेश पंडित यांच्या अध्यक्षतेखाली ३३ सदस्य कार्यरत असणाऱ्या असोसिएशन ची स्थापना झाली आहे.
असोसिएशन तर्फे चिरनेर येथील विनया आत्माराम नारंगीकर या विकलांग मुलीस देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनी गोवठणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिवंगत स्व.गोपाळ वर्तक यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र आणि असोसिएशन चे सचिव सुनिल वर्तक यांच्या सौजन्याने विकलांग सायकल प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला.सायकल प्रदान कार्यक्रमासाठी चिरनेर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य पद्माकर फोफेरकर, अभिनव सामाजिक संस्थेचे रवींद्र भगत, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ भगत, गणेश म्हात्रे, किरण नारंगीकर या मान्यवरांसमवेत असोसिएशन चे उपाध्यक्ष शाम ठाकूर,सचिव सुनिल वर्तक, सल्लागार पप्पू सूर्यराव, सदस्य अमृत ठाकूर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे निवेदन, सुत्रसंचालन असोसिएशनचे अध्यक्ष नितेश नितेश पंडित आणि सल्लागार राजेंद्र भगत यांनी केले.