पाळा येथे युवा शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या पाळा गावात शोककळा

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.13
मोर्शी : मोर्शी येथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पाळा येथे एका युवा शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सुमित केशव राऊत रा. पाळा असे मृताचे नाव आहे.
मोर्शी येथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पाळा येथे एका युवा शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सुमित केशव राऊत रा. पाळा असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे मोर्शी तालुक्यात शोककळा पसरली आहे.
नापिकी, कर्जामुळे उचलले पाऊल
पाळा येथील रहिवासी सुमित हा उच्चशिक्षित असून, त्याने दहा एकर ओलिताच्या शेतीसाठी पैसे खर्च केले. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे सततची नापिकी झाल्याने त्याला मोठे नुकसान सहन करावे लागले. यासोबतच यंदा संत्राचे भाव पडल्यामुळेही नुकसान झाले. त्यातच कर्जाचा वाढता डोंगर पाहून सुमित त्रस्त झाला होता. अखेर सुमितने आत्महत्येचे पाऊल उचलले. सुमितच्या वडिलांचा पूर्वीच मृत्यू झाला असून, त्याच्या पश्चात आई व एक बहीण आहे.
झाडाला लावला फास
सुमितने गुरुवारी दुपारी शेतातील एका झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपविली. घटनेच्या माहितीवरून मोर्शी पोलिसांनी पंचनामा केला, मृतदेहाला शवविच्छेदनाकरिता शासकीय रुग्णालयात पाठविला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.