विधानसभा निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे आणि निर्भय वातावरणात पार पाडावी -निवडणूक निरिक्षक (सामान्य) वेद पती मिश्र
केंद्रीय निवडणूक निरिक्षक यांनी घेतला विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

जालना/प्रतिनिधी,दि.31
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने निवडणूकीच्या अनुषंगाने चांगली पूर्वतयारी केलेली असुन, ही निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या गांभिर्यपूर्वक पार पाडण्याचे निर्देश 101-जालना, 102-बदनापूर (अ.जा.) आणि 103 भोकरदन विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) वेद पती मिश्र यांनी यावेळी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सभागृहात आयोजित विधानसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत श्री. मिश्र हे बोलत होते. यावेळी 99-परतूर आणि 100-घनसावंगी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री. नवीन, निवडणूक निरीक्षक (पोलीस) झेड ॲन विजया, निवडणूक निरीक्षक (खर्च) देव प्रकाश बमणावत जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार, अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, बीएसएफचे अजयकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उप जिल्हा निवडणुक अधिकारी शशिकांत हदगल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. मिश्र म्हणाले की, जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांच्या टीमने विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व प्रक्रीयेची पुर्वतयारी खुप चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे. परंतू आता या पुर्वतयारीची प्रत्यक्षात योग्य अंमलबजावणी करणे आवश्यक असून, त्यासाठी सर्वांनी योग्य नियोजन करत आपल्या जबाबदारी पार पाडाव्यात. आपण आता निवडणूकीच्या महत्वाच्या टप्प्यावर पोहचलो असून, सर्वांनी गांभिर्याने निवडणूकीचे काम करावे. सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना निवडणूकीच्या अनुषंगाने चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करावे. पोस्टल मतदानाचे योग्य नियोजन करावे. तसेच भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा उपलब्ध असणे बंधनकारक आहे. यात ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हिलचेअर, मतदारांचे उन्हापासून संरक्षणासाठी शेडची व्यवस्था, वैद्यकीय उपचार किट, मदत कक्ष, पिण्याचे पाणी, प्रसाधन गृह, आदीं सुविधा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपल्या मतदार संघात आहेत का ? याची खात्री करुन घ्यावी. प्रामुख्याने ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर आवश्यक सोयी-सुविधा आहेत का ? ज्या क्रिटीकल मतदान केंद्रावरुन वेबकास्टींग होणार आहे तेथील इंटरनेट सुविधा सुरळीत राहील याची काळजी घ्यावी. तसेच दूरस्थसह इतर सर्व मतदान केंद्राच्या मार्गाची आणि संपर्क व्यवस्थेची देखील तपासणी करुन ठेवावी. ज्याठिकाणी त्रुटी आहेत त्यासुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधीत यंत्रणेला निवडणूक निरिक्षक (सामान्य) श्री. मिश्र यांनी यावेळी दिले.
निवडणूक कालावधीत मतदार संघात प्रसारीत होणाऱ्या राजकीय पेड न्यूज आणि राजकीय पुर्वप्रमाणिकरण न केलेल्या जाहिराती, तसेच सोशल मिडीयावरील जाहिरातीवर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीने (एमसीएमसी) लक्ष ठेवावे. तसेच संशयीत पेड न्युज किंवा जाहिराती प्रसारित झाल्यास संबंधीत उमेदवारास खुलासा करण्याची नोटीस देण्यात यावी. तसेच एफएसटी, एसएसटी, व्हीएसटी आणि व्हिव्हिटी भरारी पथकांनी वेळोवेळी आपली स्थाने बदलून तपासणी करावी. निवडणूकीसाठी नियुक्त केलेल्या सर्व पथकांनी निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडावयाची आहे. मतदारांमध्ये जनजागृती करत, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याच्या सुचना ही श्री. मिश्र यांनी यावेळी दिल्या.
श्री. नविन यावेळी म्हणाले की, विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी सर्व यंत्रणांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत व नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी गांभिर्यपूर्वक पार पाडावी. विधानसभा मतदारसंघातील संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची गांभीर्याने काळजी घ्यावी.
यावेळी निवडणूक निरीक्षक (पोलीस) झेड ॲन विजया म्हणाल्या की, निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाने तयारी पुर्ण केली आहे. परंतु जे नियोजन केले आहे, त्यानुसार कायदा सुव्यवस्था राखण्याची योग्य अंमलबजावणी करावी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी निवडणुक प्रक्रियेमध्ये व्यत्यय आणणाऱ्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. निवडणुकीच्या प्रचाराला आता मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार असल्याने विनापरवाना प्रचार करणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई करावी.
निवडणूक खर्च निरीक्षक श्री. बमणावत यांनी खर्च पथकांनी विविध माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर सर्व बाबींची दैनंदिन नोंद ठेवून बारीक लक्ष ठेवावे. निवडणूक कालावधीत अर्थिक व मद्याचा गैरव्यवहार होण्याची शक्यता असल्याने मतदारसंघातील वाहनांची कसून तपासणी करावी, तसेच अशी वाहने आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी. उमेदवारांना 40 लाखांची खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे, त्यावर देखील खर्च पथकाने दैनंदिन लक्ष ठेवावे, निवडणूक कालावधीत जिल्ह्यात होत असलेली मद्य विक्रीवर देखील बारकाईने लक्ष ठेवावे. एफएसटी, एसएसटी, व्हीएसटी आणि व्हिव्हिटी भरारी पथकांनी गांभिर्याने तपासणी करण्याचे निर्देश ही श्री. बमणावत यांनी यावेळी दिले.
प्रारंभी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालय, जालना यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या जालना जिल्हा विधानसभा मतदार संघ निवडणूक-2024 पूर्वपिठीकेचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. तसेच निवडणूक दिव्यांग आयकॉन डॉ. निलेश मदारे यांनी मतदान जनजागृतीबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचे तर पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी कायदा सुव्यस्थेच्या तयारीची सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती सादर केली.
यावेळी बैठकीस सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह संबंधीत विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.