जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे येथे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18
आत्माराम ठाकूर मिशन (रजि.) संचालित जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे १४ वे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उदघाटन ग्रुप-ग्रामपंचायत आवरे सरपंच निराबाई पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर, खजिनदार वामन ठाकूर तसेच सामाजिक कार्यकर्ते एम. के. म्हात्रे, कौशिक ठाकूर, अमित म्हात्रे, विलास गावंड,ऍडव्होकेट मनोहर ठाकूर व शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्षा शुभांगी पाटील, आवरे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पाटील हे उपस्थित होते.
आज इंग्रजी शिक्षण ही काळाची गरज आहे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ते मिळाले पाहिजे त्याच साठी दर्जेदार शिक्षणाची गरज आहे. जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे ही इंग्रजी माध्यमाची शाळा दर्जेदार शिक्षण देणारी शाळा आहे असे प्रमुख वक्ते एम.के. म्हात्रे यांनी व्यक्त केले. यावेळी आदर्श शिक्षक कौशिक ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड व सरपंच निराबाई पाटील यांनी आपली मते व्यक्त केली. अहवाल वाचन शाळेच्या मुख्याध्यापिका निकिता म्हात्रे यांनी केले. स्नेहसंमेलनात कोळी गीते, पोवाडे, नाटके व विशेष करून ९० च्या काळातील गीते व नृत्ये सादर करण्यात आली.
शालेय क्रीडा स्पर्धा तालुका स्तर जिल्हा स्तर व राज्य स्तरावर ज्या विद्यार्थ्यांनी विशेष पारितोषिके पटकावली त्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, पदके देवून गौरवण्यात आले. तसेच गेल्यावर्षी शाळेचा १००% निकाल लागलेल्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले. आत्माराम ठाकूर मिशन या संस्थेकडून सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात विशेष कार्य करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका निकिता म्हात्रे यांना बेस्ट टीचर अवार्ड देवून गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा म्हात्रे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रियांका घरत यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.