pub-7425537887339079
Breaking
संपादकीय

‘राष्ट्रीय मतदार दिवस’ : मतदार जागृती

0 3 1 8 4 5

जालना, दि.25

भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी, 1950 रोजी झाली असून, स्थापनेचा 25 जानेवारी’ हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मतदार असल्याचा अभिमान मतदारास असावा आणि त्यातून बळकट लोकशाहीतील मोठा सहभाग  नोंदवता यावा हा आहे.

भारतीय लोकशाही गणराज्यात प्रत्येक भारतीय नागरिकाला सार्वत्रिक तथा पोट निवडणुकीत मतदानाचा मुलभूत हक्क बहाल करण्यात आलेला आहे. त्यामुळे मतदार यादीत नांव नोंदवून मतदान करण्याचे कर्तव्य पार पाडून लोकशाही बळकट करण्याचा वाटा उचलण्याची संधी प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे.

भारतातील युवा मतदारांना सक्रीय राजनीती मध्ये भाग घेण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता सन 2011 पासून भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी’ हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात यावा, असे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार यावर्षी 15 वा राष्ट्रीय मतदान दिवस साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय मतदार दिवसाची यावर्षाची थीम मतदानासारखे काही नाही, मी खात्रीने मतदान करतो’’ ही आहे. जी निवडणूक प्रक्रियेतील सहभागाच्या महत्त्वावर जोर देते, आणि मतदारांना त्यांच्या मताधिकाराचा वापर करण्यात अभिमान बाळगण्यास प्रोत्साहित करते.

देशातील प्रत्येक नागरिकास आपण या देशाचे सुजाण नागरिक असून मतदान करणे हा आपला मुलभूत हक्क असल्याची जाणीव होण्याकरीता या राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व आहे. या ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ निमित्त 18 वर्ष पूर्ण होत असलेल्या आणि 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवयुवक युवतींना मतदारांना तसेच ज्या नागरिकांनी अद्यापही यादीत आपले नांव नोंदविले नाही अशा नागरिकांना मतदार यादीत आपले नांव नोंदवून ओळख पत्र भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येते. मतदार म्हणुन नाव नोंदवण्यासाठी या वर्षात 4 संधी असणार आहेत. जर तुम्ही 2026 च्या जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्याच्या आधी 18 वर्षाचे होणार असाल तर अर्ज क्र. 6 भरुन आगाऊ मतदार नोंदणी करु शकता.

दिनांक 01 जुलै, 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह यादीच्या द्वितीय विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत दि. 30 ऑक्टोबर, 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार जालना जिल्ह्यातील पाच मतदार संघामध्ये एकूण 16 लाख 52 हजार 511 मतदार आहेत. त्यापैकी स्त्री मतदार 7 लाख 92 हजार 166 तर पुरुष मतदार 8 लाख 60 हजार 303 आणि इतर 42 मतदार आहेत. या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त स्त्री मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न आहे. कारण जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या कमी असून ज्या महिलांनी मतदार यादीत नांव नोंदविले नाही त्यांनी आता या कार्यक्रमानिमित्त महिला मतदारांनी नावे नोंदविली पाहिजेत.

जालना जिल्ह्यात दि. 1 जूलै, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादींची द्वितीय विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत दिनांक 06 ऑगसट, 2024 ते 20 ऑगस्ट, 2024 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. पुनरिक्षण कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. एकूण 19 हजार 937 दावे व हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 17 हजार 700 निकाली काढण्यात आले आहेत.  नव्याने नोंदणी झालेल्या 10 हजार 847 तसेच नोंदीतील दुरूस्ती केलेल्या 5 हजार 034 अशा एकूण 15 हजार 881 मतदारांना राष्ट्रीय मतदार दिवस-2025 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने नव्यानेच जारी केलेले स्मार्टसाइज प्लॅस्टीक मतदार ओळखपत्राचे (PVC-EPIC) वाटप पोस्ट ऑफिसमार्फत करण्यात येणार आहे. सदर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात 1 हजार 819 मतदारांची वगळणी करण्यात आली आहे. मतदार यादीमध्ये 6 हजार 875 मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता एकूण मतदारांची संख्या 16 लाख 52 हजार 511 एवढी झाली आहे.

जालना जिल्ह्याची सन-2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 18 लाख 36 हजार 86 इतकी असून जानेवारी, 2024 ची अनुमानित (Projected) लोकसंख्या 22 लाख 19 हजार 895 इतकी आहे. त्यामध्ये एकूण मतदार 16 लाख 52 हजार 511 मतदार आहेत. लोकसंख्येशी मतदाराचे प्रमाण 74.40 टक्के आहे. मतदारांनी आपले नाव अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीत असल्याबाबत खात्री करावी.

वयाची 18 वर्ष पुर्ण झालेल्या अधिकाधिक तरूणांनी छायाचित्र मतदार याद्यांचा सततचा पुनरिक्षण कार्यक्रम-2025 च्या कालावधीत आपली नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी, तसेच मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी, मतदार यादीत दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी संबधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) / संबंधीत तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी / संबंधीत उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावेत किंवा http://www.nvsp.in/ या संकेतस्थळावरून ऑनलाईन सादर करावेत. अधिक माहितीसाठी https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. या मतदार दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त नवीन मतदारांना निमंत्रित करण्यात येणार आहे. त्यांना या कार्यक्रमात मतदार ओळखपत्र, बिल्ले, प्रदान करुन प्रतिज्ञा दिली जाणार आहे. तसेच जिल्ह्यात राष्ट्रीय मतदार दिवसाबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आपण आपल्या लोक प्रतिनीधीस मतदान करण्याची संधी गमावणे म्हणजे आपण आपला भारतीय नागरिक असल्याचा हक्क गमावल्यासारखे आहे ! तर चला ! आपण सर्व भारतीय नागरिक या राष्ट्रीय मतदार दिवसानिमत्त आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करुन आपला मतदानाचा हक्क बजावण्यास सज्ज होऊ या…!

अरुण सूर्यवंशी

जिल्हा माहिती अधिकारी,जालना

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 8 4 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे