जालना जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यातील क्लोरीन वॉश अभियान यशस्वी करावे – जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना

जालना/प्रतिनिधी,दि.31
जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहेत. पावसाळ्यात अशुद्ध पाण्यामुळे जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व गावांत क्लोरीन वॉश नावाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. तरी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पाणी पुरवठा कर्मचारी यांच्यासह गावातील पदाधिकारी, ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा व जालना जिल्ह्यात राबविण्यात येणारे क्लोरीन वॉश अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
क्लोरीन वॉश अभियानात ग्रामसेवक व जलसुरक्षक यांच्याकडून करावयाची कामे पुढीलप्रमाणेआहेत.
• गावातील पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्त्रोतांचे जैविक व रासायनिक पाणी नमुने तपासण्यात येणार.
•पाणी तपासणीसाठी 8 तालुक्यांसाठी 4 उपविभागीय प्रयोगशाळा सज्ज.
• गावातील पाणी पुरवठा योजनेच्या टाक्यांची आतून स्वच्छता करणे त्यातील सर्व गाळ, माती, दगड काढून आतून स्वच्छता करणे.
• गावातील विहिरीत पडलेला कचरा जसे की, झाडाचा कचरा, वाढलेले झाडे काढणे, परिसर स्वच्छता विहिरीजवळचा सांडपाणी परिसर स्वच्छ करणे.
• गावात तीन महिने पुरेल एवढा योग्य गुणवत्तेचा ब्लिचिंग पावडरचा साठा उपलब्ध करून ठेवणे.
• प्रत्येक स्त्रोतांची विहीर हात पंप यांची ब्लिचिंग पावडरच्या सहाय्याने शुद्धीकरण करणे.
• फिल्ड टेस्ट किट्सच्या सहाय्याने प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक स्रोत, कोणतेही दोन घरगुती नळ कनेक्शन, शाळा, अंगणवाडी, इत्यादी पाणी नमुने जैविक व रासायनिक तपासणी गावातच करणे.
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामसेवकांनी स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून सचित्र अहवाल सादर करावा. यामध्ये अहवाल सादर करताना गावातील पाणी पुरवठा टाकीची आतून स्वच्छता करताना व ब्लिचिंग पावडरच्या सहाय्याने स्त्रोतांचे निर्जंतुकीकरण, क्लोरिनेशन करताना छायाचित्रासह अहवाल दि. 10 जुन 2024 रोजी पंचायत समितीस्तरावर सादर करावा लागणार आहे. जिल्ह्यातील 8 तालुक्याच्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी त्यांच्या तालुक्यातील एकत्रित अहवाल जिल्हास्तरावर सादर करणार आहेत.
जिल्ह्यात क्लोरीन वॉश अभियान यशस्वी करण्यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे. त्या अनुषंगाने सर्व जलसुरक्षक यांच्या तालुकानिहाय बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पाणी पुरवठा कर्मचारी यांच्यासोबतच गावातील पदाधिकारी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. जेणेकरून अभियान यशस्वी करण्यासाठी मोलाचा हातभार लागेल.
अभियान यशस्वी करण्यासाठी जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक ज्योती कवडदेवी, बालचंद जमधडे, एन.डी.पाडेवार, पाणी गुणवत्ता तज्ञ श्रीकांत चित्राल, नम्रता गोस्वामी, हिमांशु कुलकर्णी, भगवान तायड, जय राठोड, संजय डोंगरदिवे, शुभम गोरे इत्यादी परिश्रम घेत आहेत. असे प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.