pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात संपन्न आपला मतदानाचा अमुल्य अधिकार कुठल्याही परिस्थितीत बजावावा – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

0 1 7 7 8 1

जालना/प्रतिनिधी,दि.25

भारतीय संविधानाच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या भारत देशाचा उल्लेख करण्यात येतो. भविष्यातील सुजान नागरिक म्हणून लोकशाहीची धुरा आता तरुणांच्या हाती आली आहे. तरी लोकशाहीचे अधिक बळकटीकरण करण्यासाठी युवा पिढीने आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करुन सर्व निवडणूकीत आपला मतदानाचा अमुल्य अधिकार कुठल्याही परिस्थितीत बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जालना येथील बद्रीनाथ बारवाले महाविद्यालयाच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, दयानंद जगताप, तहसीलदार छाया पवार, चंद्रकांत शेळके, शिक्षण संस्थेचे सुरेश अग्रवाल, अरुण अग्रवाल, स्वीप आयकॉन किशोर डांगे, दिव्यांग स्वीप आयकॉन नितेश मदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, दरवर्षी जनजागृतीसाठी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय संविधानाने आपल्या देशातील सर्व जाती-धर्म-पंथाच्या अठरा वर्षे पुर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार प्रदान केला आहे. युवकांनी ठरविल्यास निवडणूकीत अपेक्षित बदल घडून येवू शकतो. नुकत्याच झालेल्या मतदान यादी पुनरिक्षणात कार्यक्रमात जिल्ह्यात जवळपास 23 टक्के युवा मतदार असल्याचे दिसून येते. तरी समाजातील चांगला व्यक्ती या नात्याने युवकांनी अवश्‍य मतदान करावे. सध्या अठरा वर्षे पुर्ण झालेल्या परंतू मतदार यादीत नाव नसलेल्या विद्यार्थी- विद्यार्थींनीं सर्वांनी आपले नाव समाविष्ट करावे तसेच आपले मित्र, नातेवाईकांसह शेजाऱ्यांनाही मतदान करण्यास भाग पाडावे. आधार कार्डची आपल्याला कोठेही पुरावा म्हणून गरज भासत असते त्यामुळे ते आपण आवर्जून काढतो. त्याप्रमाणेच मतदान आपण स्वत:साठी, राष्ट्रासाठी करत आहोत ही भावना आपल्या मनात कायम ठेवणे गरजेची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पोलिस अधिक्षक श्री.बलकवडे म्हणाले की, अनेक शुरविरांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र मिळाले असून स्वातंत्र्यानंतर आपल्या लोकशाही मिळाली आहे. मतदानाच्या दिवशी असलेली सुट्टी ही कर्तव्य पार पाडण्यासाठी मिळालेली संधी आहे. भारतीय संविधानाने सर्वांना एका मताचा अधिकार दिला असून आपले मत कधीही विकु नका त्याचे मुल्य जाणून जबाबदारी पाळावी. युवकांनी राष्ट्रीय कार्यात सहभाग घेत मतदान आवर्जून करावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात “चलो मतदान करे” या गीताने करण्यात आली. तसेच मतदार दिनाची आम्ही मतदान करणार असल्याची प्रतिज्ञाही उपस्थितांना देण्यात आली. राष्ट्रीय मतदार दिवस राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, तालुका व मतदान केंद्रस्तरावर साजरा करण्यामागचा उद्देश कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय कायंदे यांनी केले तर आभार जिल्हा निवडणूक विभागाचे संतोष मुसळे यांनी मानले. भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांचा चित्ररथावरील दृकश्राव्य जनजागृतीपर संदेशही यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आला. ज्यांनी महाविद्यालयीन शिबीरातून आपले नाव नुकतेच मतदार यादीत नोंदविले आहे अशा नवमतदारांना मान्यवरांच्या हस्ते मतदार कार्डचे वाटपही करण्यात आले. तसेच मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला, रांगोळी व इतर स्पर्धेत सहभाग नोंदवत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थी-विद्यार्थींनींचा गौरवही करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी विद्यार्थी प्रतिनिधींनी आपले मत व्यक्त करण्याचे आवाहन केले असता तत्परतेने स्वामीनी देशमुख, रोहिनी ठाकूर, संचिता डासाळ, गजानन गवारे, शेख शकील या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येत आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिकासह महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे