जालना विधानसभा मतदार संघातील घानेवाडी येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा जलाशय परिसरात तब्बल १०० कोटी रुपये खर्चाच्या सौरऊर्जा प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ. कैलास गोरंटयाल यांनी दिली.
जालना शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असतांना आपण आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात जायकवाडी – जालना ही महत्त्वाकांक्षी योजना मंजूर करून ती कार्यान्वित देखील केली आहे. मात्र,या योजनेद्वारे जालना शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वीज बिलांवर वर्षाकाठी जवळपास कोटयावधी रुपयांचा खर्च महानगर पालिकेला करावा लागत असून या होणाऱ्या खर्चात बचत व्हावी यासाठी आपण घानेवाडी येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा जलाशय परिसरात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्या बाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता. सदर प्रस्तावास मंजुरी मिळावी यासाठी आपण शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली असल्याचे आ. गोरंटयाल यांनी सांगितले. २ मेगावॅट वीजनिर्मिती या प्रकल्पाद्वारे होणार असून सद्यस्थितीत १६ एमएलडी पाणी घेतल्यास महिन्याकाठी १ कोटी २५ लक्ष तर ४० ते ६० एमएलडी पाणी घेतल्यास ३ कोटी ५० लक्ष इतका खर्च होणार असून अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या जालना महानगर पालिकेला हा खर्च झेपणारा नाही. राज्य शासनाने मंजूर केलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे दोन मेगावॅट वीज निर्मिती होणार असून यामुळे जायकवाडी – जालना या पाणीपुरवठा योजनेद्वारे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा वीज बिलावर होणारा खर्च कमी होऊन महापालिकेला मोठी मदत होईल आणि बचत होणारा हा पैसा शहरातील विविध विकास कामांवर खर्च करता येईल असेही आ. कैलास गोरंटयाल यांनी सांगितले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा