अमरावती-मोर्शी मार्गावर द बर्निंग कारचा थरार -दाम्पत्य थोडक्यात बचावले

मोर्शी/प्रतिनीधी,दि.18
मोर्शी : शहरातील गोपाल नगर मराठा कॉलनी परिसरात राहणारे दाम्पत्य विवाह सोहळ्यासाठी अमरावती वरून आपल्या चार चाकी वाहनाने मोर्शीकडे जात होते. त्यावेळी अचानक धावत्या कारमध्ये आग लागली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने या द बर्निंग कार च्या थरार मध्ये अमरावती येथील दाम्पत्य थोडक्यात बचावले. ही घटना शुक्रवारी दि.१७घडली. अधिक माहितीनुसार गोपाल नगर परिसरात राहणारे राजेंद्र दाभाडे आणि त्यांची पत्नी शुक्रवारी सकाळी दहा वाजता मोर्शी येथे होणार्या विवाह सोहळ्यासाठी घरून आपली होंडा सिटी कार एमएच ०६ एबी ९७८५ ने निघाले होते. मोर्शी मार्गावर पोल्ट्री फार्म समोर त्यांना स्टेरिंग मधून धूर निघताना दिसला. त्यामुळे त्यांनी कारचे बोनट उघडून पाहिले तर शॉर्टसर्किटमुळे त्यामध्ये आग लागली होती. ही आग आटोक्यात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण आग आटोक्यात येत नव्हती. दरम्यान अचानक कारमध्ये आगीचा भडका उडाला. यामुळे कार जळून खाक झाली. सुदैवाने यात दाभाडे दाम्पत्य थोडक्यात बचावले आहे. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. मार्गावर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दि जमा झाली होती.