राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धा पुर्व प्रशिक्षणास सुरूवात

जालना/प्रतिनिधी,दि.23
आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राष्ट्रीय शालेय बेसबॉल (14 व 19 वर्षाखालील मुले व मुली) स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीर 2023-24 आयोजनाची जबाबदारी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जालनाकडे सोपविलेली आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने, राष्ट्रीय शालेय बेसबॉल (14 व 19 वर्षाखालील मुले व मुली) स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीरास दि. 21 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलावर सुरुवात करण्यात आली आहे.
प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन दि. 21 जानेवारी 2024 रोजी प्राचार्य डॉ. गणेश अग्नीहोत्री यांच्या हस्ते मैदानाचे पुजन करून झाले. सदर प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. हेमंत वर्मा, जिल्हा बेसबॉल असोशिएशन सहसचिव सोपान शिंदे उपस्थित होते.
यावेळी राज्यातून आलेल्या महाराष्ट्र राज्य बेसबॉल ( 14 व 19 वर्षाखालील मुले व मुली) संघ, खेळाडूंना प्रमुख उदघाटक प्राचार्य डॉ. गणेश अग्नीहोत्री यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले तर सुत्रसंचालन श्रीमती रेखा परदेशी यांनी केले. राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धा 2023-24 चे आयोजन कोरबा, छत्तीसगड येथे दि. 28 जानेवारी 2024 ते 1 फेब्रुवारी 2024 दरम्यान करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत राज्याचे निवडण्यात आलेले 14 वर्षाखालील मुले व मुली व 19 वर्षाखालील मुले व मुली असे एकुण चारही संघ सहभागी होत आहेत.
महाराष्ट्र संघासोबत 14 वर्षाखालील मुले संघास प्रशिक्षक श्री पवन माने, 14 वर्षाखालील मुली संघास श्रीमती क्षितीजा गव्हाणे व संघ व्यवस्थापक म्हणून यशवंत जगदाळे तर 19 वर्षाखालील मुले संघास प्रशिक्षक प्रा. अशोक देवकर, 19 वर्षाखालील मुली संघास कु. ईश्वरी शिंदे व संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. दिनकर थोरात यांची क्रीडा आयुक्त यांनी नियुक्ती केली असून हा संघ राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेकरिता दि. 26 जानेवारी 2024 रोजी रवाना होणार आहेत. खेळाडू मुलांची निवास व्यवस्था जिल्हा सैनिक कल्याण वसतीगृह, जालना व मुलींची निवास व्यवस्था समाजकल्याण शासकीय मुलींचे वसतीगृह, जालना व भोजनाची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकल, जालना येथे करण्यात आली आहे. संघातील खेळाडूंना ट्रॅकसुट व किट देण्यात येणार आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.