जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द – पालकमंत्री पंकजा मुंडे

जालना/प्रतिनिधी,दि.26
स्वातंत्र्य हा आपला अधिकार तर प्रजासत्ताक हा आपला अलंकार आहे. जालना जिल्ह्यात भाईचारा व संविधानाला सन्मान देणारा वर्ग उदयास यावा अशी आशा व्यक्त करते. तसेच जालना जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीकरीता तसेच जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द राहिल, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर श्रीमती मुंडे यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, आमदार हिकमत उढाण, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदींसह स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली भारतीय राज्यघटना राष्ट्राला अर्पण करण्यात आल्याने जगामध्ये भारत देश एक प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आले. लोकशाही तंत्राने घटनेनुसार देशाचा कारभार सुरु झाला. नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाल्याने या दिवसाला विशेष महत्व आहे. भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीमध्ये अमुल्य योगदान राहिले. त्यामुळेच जगात भारतीय लोकशाही श्रेष्ठ ठरली आहे.
आपला जालना जिल्हा विकासाभिमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो. विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे विविध क्षेत्रात सतत अग्रेसर राहिला आहे, त्याचा मला जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून अतिशय आनंद आणि अभिमान आहे. राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेसाठी काही महत्वकांक्षी योजना सुरु केल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज पुरवठा योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना या योजनांचा समावेश आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत जालना जिल्ह्यात 5 लाख 25 हजार पात्र महिलांना या योजनेअंतर्गत प्रति महा 1 हजार 500 लाभ देण्यात येत आहेत. तसेच राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरु करण्यात आली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात 2 हजाराहून अधिक अर्ज प्राप्त असून, त्यातील 468 जेष्ठ नागरिकांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नौकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरु करण्यात आली असुन आतापर्यंत 1 हजार 665 बेरोजगार युवकांची शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणुन निवड करण्यात आलेली आहे. तसेच राज्यातील 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थयात्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज स्विकारुन योग्य कार्यवाही सुरु आहे. ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज पुरवठा योजना’ अंतर्गत शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार कमी करणे हा आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या 7.5 हॉर्सपावर क्षमतेच्या शेती पंपाना मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे. तसेच राज्यातील मुलींना बारावी नंतर उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षण देण्याची योजना सुरु केली असुन, यामध्ये शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के लाभ देण्यात येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि राज्याचे नाव देशात अग्रेसर ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाचा 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करून, ठोस कामगिरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या आराखड्यात लोककेंद्रित व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनतेला लाभ मिळणाऱ्या योजना आदींचा समावेश असणार आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत कुक्कुट पालनाचे 2 प्रकल्प पूर्णत्वास येत असून, शेळी-मेंढी पालनाचे 4 प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहेत. या अंतर्गत जिल्हा उद्योजक, रोजगार आणि उत्पादन निर्मिती होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व पशुपालक उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून स्पर्धात्मक व सर्वसमावेक्षक पशुसंवर्धन मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत 6 प्रकल्प आपल्या जिल्ह्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा ओळख क्रमांक तयार करण्यात येत आहे. या शेतकरी ओळख क्रमांकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील धनगर व तत्सम जमातीतील मेंढी पालन करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत 273 लाभार्थ्यांना विविध 18 उपघटकातंर्गत लाभ देण्यात येणार आहे. शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी पालनाकरीता तसेच मराठवाडा पॅकेजअंतर्गत गाय, म्हैस, शेळी गटासाठी प्रत्येकी 1 हजार लाभार्थ्यांसाठी 50 टक्के अनुदानावर विशेष योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 21 व्या पशुगणनेला 25 नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला असून, याकरीता 160 प्रगणक व 1 पर्यवेक्षक सदर काम पूर्णत्वास नेत आहेत.
स्टील व सीडस उद्योगामुळे आपला जिल्हा ओळखला जातो. यापुढे सिल्क अर्थात रेशीम शेती व त्यावरील प्रक्रिया उद्योगामुळे जिल्ह्याची नवीन ओळख निर्माण होत आहे. नवीन तुती लागवड करुन, जालना जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जालना येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲटोमॅटीक रिलींग मशीनचीही उभारणी करण्यात आली असून, याद्वारे उत्कृष्ट दर्जाचे रेशीम सुताची निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. रेशीम सूत उत्पादनाची पुढील प्रक्रीया जसे हातमागावर कापड बनविण्याचे काम लवकरच जालना येथे सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बालविवाह रोखण्यासाठी मागील कालावधीत जिल्ह्यात चांगले काम झाले आहे. जिल्ह्यात मागील वर्षात 137 बाल विवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागाला यश आले आहे. क्रीडा विभागाच्यावतीने विकसीत करण्यात येत असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्यातील विकासकामाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले असुन दुसऱ्या टप्प्यातील विकासकामे प्रगतीपथावर आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा असलेले तालूका क्रीडा संकुल विकसीत करण्यात येत आहे. तसेच ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह योजनेतंर्गत जालना जिल्ह्यासाठी 12 नवीन वसतिगृहे मंजूर झाली असून , यापैकी 8 वसतिगृहे सुरु झाली आहेत. कायदा व सुव्यवस्था, सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी जिल्हा नियोजनच्या निधीतून जालना शहरात 90 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. यामुळे पोलिस विभागाला गुन्हेगारी रोखण्यास मदत होणार आहे. जालना महानगर पालिका क्षेत्रातील नगर भूमापन झालेल्या क्षेत्रातील मिळकत पत्रिकासंदर्भात जनतेच्या तक्रारी वाढत आहेत. अशा स्वरुपाच्या तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी तसेच यापुढे अशा तक्रारी प्राप्त होवू नये याकरीता जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख यांनी ‘जालना महानगर पालिका क्षेत्रातील नगर भुमापन मिळकतींचे जी.आय.एस. आधारीत सर्व्हेक्षण’ सुरु केले आहे. या कार्यक्रमास ‘पवित्र’ असे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नगर भूमापन क्षेत्रातील प्रत्येक मिळकतीस अक्षांस व रेखांश मिळणार आहेत. यामुळे भविष्यात मिळकतीच्या हद्दी संदर्भात वाद उत्पन्न होणार नाहीत, तसेच बिनशेती भुखंडाच्या मालकी हक्कांचे संरक्षण होणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते जालना जिल्ह्यातील गौरवास्पद कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचारी, खेळाडू, गुणवंत मार्गदर्शक, गर्भलिंग निदान प्रतिबंधक समिती पथक यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, मान्यवर व नागरिकांची भेट घेत त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. यानंतर पालकमंत्री यांनी पोलीस परेडचे निरीक्षण केले. यावेळी पोलीस, होमगार्ड, सैनिक शाळेचे विद्यार्थी, एनसीसीच्या विद्यार्थ्यी यांची मानवंदना स्विकारली सलामी देण्यात आली. विविध विभागांनी चित्ररथाद्वारे योजनांचे सादरीकरण केले. शेवटी पोलिस विभागाने सायबर फ्रॉड जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सुंदर नृत्याचे सादरीकरण केले.