डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी मदरशांना आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.25
अल्पसंख्यांक विकास विभागाकडून मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देणे यादृष्टीने डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. तरी जालना जिल्ह्यातील पात्र मदरशांनी दि.15 सप्टेंबर, 2024 पर्यंत जालना येथील जिल्हा नियोजन समिती कार्यालयात अर्ज सादर करुन डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अल्पसंख्यांक विकास विभागाकडून मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांस समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपरिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी,
मराठी, इंग्रजी व उर्दू या विषयाचे शिक्षण देणे गरजेचे आहे. मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इयत्ता नववी, दहावी व बारावी तील तसेच औद्योगिक शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृती देणे, परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होऊन त्यांची रोजगार क्षमता वाढून आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल. या दृष्टीने मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देणे यादृष्टीने डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यास शासन मंजूरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून सन 2024-25 या वर्षासाठी सदर योजना राबविण्यात येणार आहे. शासन निर्णयातील कार्यपद्धतीचा अवलंब करून तसेच अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या मदरशांनी अर्जासोबत शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रांच्या मूळ, साक्षांकित प्रती जोडून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना या कार्यालयात दाखल करण्याची अंतिम मुदत दि. 15 सप्टेंबर, 2024 पर्यंत आहे. तसेच अर्जाचा नमूना महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर शासन निर्णय अंतर्गत तसेच अल्पसंख्यांक विकास विभागाच्या https://mdd.maharashtra.gov.in संकेतस्थळावर योजना-शैक्षणिक अंतर्गत अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. तसेच https://jalna.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.