उरणमध्ये पुन्हा घडली ‘हिट अँड रन’ची भीषण घटना
विकास मुंबईकर यांच्या दुचाकीला धडक देऊन मारुती सुझुकी पसार पूर्ववैमनस्यातून चंद्रकांत पाटील यानेच अपघात करवून आणल्याचा आरोप तालुक्यात गुन्हेगारी बोकाळली ! गैरप्रकारांना आळा घालण्यात प्रशासन अपयशी?

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.16
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात गुन्हेगारीला पेव फुटले आहे. अनेक मारहाणीच्या तसेच हिट अँड रन च्या घटना तालुक्यात वारंवार घडत आहेत.या मध्ये अनेकांचा नाहक बळी सुद्धा जात आहे.उरण मध्ये अशीच एक घटना घडली आहे.
दिनांक ७ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री साडे ११ वाजण्याच्या सुमारास उरण तालुक्यातील वेश्वि येथील रहिवाशी विकास अनंत मुंबईकर यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने ते केक आणण्यासाठी त्यांची दुचाकी क्रमांक MH ४६ AW ५४१५ घेऊन वेशवी ते तिघोडे असे जात होते. त्यावेळी क्रिस्टल यार्ड येथे एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात ते दुचाकी वरून उडून रस्त्यावर पडले आणि त्यांच्या उजव्या पायाच्या पोटरीला गंभीर इजा झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला तसेच त्यांना फ्रॅक्चर देखील झाल्याचे मेडिकल सुत्रंमार्फत सांगण्यात आले आहे. मात्र यावेळी अपघात करून पळ काढणाऱ्या कारचा दुसऱ्या कारने पाठलाग केला . त्या गाडीचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग देखील केले गेले . ती गाडी मारुती सुझुकी कंपनीची होती तर तिचा क्रमांक MH ४६ BQ ०७४८ असा होता.
या अपघाताबाबत गावात समजल्यानंतर विकास मुंबईकर यांचे भाचे आशुतोष पाटील, प्रतीक पाटील, आदित्य पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी हजर होत विकास मुंबईकर यांना उपचाराकरिता पनवेल तालुक्यातील पुरोहित हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या पायाचे ऑपरेशन झाले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचे तीन ठिकाणी पायाचे हाड तुटलेले आहे.
हा अपघात पूर्ववैमनस्यातून चंद्रकांत बारकू पाटील यांनी केला असल्याचा आरोप मुंबईकर कुटुंबीयांनी केला आहे. चंद्रकांत पाटील हा व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यानेच माझ्या पतीचा अपघात घडवून त्यांना जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुंबईकर यांच्या पत्नीने केला आहे तर चंद्रकांत पाटील हा पूर्वी देखील शिवीगाळ करत असे व आपल्या डोक्यावर मोठ्या व्यक्तीचा हात असून तुम्ही माझे काहीही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी वारंवार देत असल्याची तक्रार विकास मुंबईकर यांच्या पत्नीने केली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी मुंबईकर कुटुंबीयांनी केली आहे.