डिजीटल क्रॉप सर्वे अंतर्गत बदनापूर तालुक्याची पायलट प्रोजेक्टसाठी निवड
जालना/प्रतिनिधी,दि.5
केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यात खरीप हंगाम 2023 पासून डिजिटल क्रॉप सर्वे प्रायोगिक राबविण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र शासन सुचनेप्रमाणे राज्यात सध्या वापरात असलेला ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्ये अत्यावश्यक बाबींचा समावेश करुन राज्याचे ई-पीक पाहणी अॅप कस्टमाईज करण्यात आले आहे. कस्टमाईज डिजीटल क्रॉप सर्व्हे मोबाईल अॅप वापरुन खरीप हंगाम ऑगस्ट 2023 पासुन प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. तरी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्याची पायलट प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्वे पथदर्शी प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्याची निवड करण्यात आलेली आहे. पथदर्शी प्रकल्प राबविणे, खरीप हंगामात 1 ऑगस्ट 2023 पासून 114 गावांमध्ये राबविण्यात आला. रब्बी हंगाम 1 डिसेंबर 2023 पासून 148 गावांमध्ये राबविण्यात आला. उन्हाळी हंगाम 2024 मध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 1 तालुका असे 34 तालुक्यांमध्ये (2858 गावे) 15 जून 2024 अखेर राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात दि. 1 ऑगस्ट 2024 पासून खरीप हंगाम ई-पीक पाहणीची सुरवात होणार आहे. सदर हंगामा करीता सुधारित मोबाईल ई-पीक पाहणी अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
डिजिटल क्रॉप सर्वे अॅपमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या गटाच्या हद्दीवर आधारित जिओ-फेन्सिंग सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये जिओ फेन्सिंगच्या बफर अंतराच्या बाहेरून फोटो घेता येत नाही. पर्यायाने पीक पाहणी नोंदविता येत नाही. जिओ फेन्सिंगच्या बफर अंतराशी (50 मी) जुळत नसल्यास शेतकरी आणि सहाय्यक पीक पाहणी करू शकत नाहीत. तसेच कायम पड व चालू पड नोंदणीसाठी जिओ फेन्सिंग व फोटो घेणे अनिवार्य शेतकऱ्याने निवडलेल्या गटाचा नकाशा व आजूबाजूचे गट नकाशा व पीक पाहणी नोंदविनाऱ्याचे स्थान दर्शविण्यात येतो.
अॅपमध्ये काम करताना तहसील कार्यालयाच्या स्तरावरुन सहाय्यक नियुक्ती करण्यात येणार आहे. तयामध्ये सहायक हे राज्याचे ई-पीक पाहणी अॅपमध्ये शेतकरी स्तरावरील पीक पाहणीचा कालावधी संपल्यानंतर पीक पाहणी करणार आहेत. सहायक हे शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यास मदत करणे व शेतकरी स्तरावर 80 टक्के पीक पाहणी पूर्ण होईल याबाबत कार्य करणार आहेत. सहाय्यकाने मोबाईल अॅपद्वारे नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणी केलेल्या सहाय्यकास तलाठीद्वारे मान्यता देण्यात येणार आहे. तरी बदनापुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांचे शेतातील पीक पेऱ्यांची नोंदणी डिजिटल क्रॉप सर्वे अॅपवर करावी, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.