महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शस्त्रबंदीचे आदेश जारी
जालना/प्रतिनिधी,दि.3
जिल्ह्यात दि. 4 जुन 2024 रोजी 18-जालना लोकसभा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण बचाव व धनगर समाज एस.टी. प्रवर्गात समाविष्ठ करावे या अनुषंगाने जालना जिल्ह्यात विविध प्रकारचे आंदोलन कार्यक्रम सुरु आहेत. त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. तसेच सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द गटबाजी व आरोप प्रत्यारोप विविध कारणावरुन सुरु आहेत. तसेच शेतक-यांचे विविध मागण्यासाठी विविध संघटनाकडुन आत्मदहन, उपोषण, धरणे मोर्चे, निर्देशने, रास्ता रोको आदि सर्व प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये जालना जिल्ह्यात शस्त्रबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी सोहम वायाळ यांनी जारी केले आहेत.
आदेशात नमुद केल्यानूसार शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी, भाले, चाकू व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप, विडंबनापर नकला करणार नाही आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा पत्रे किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही. हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी दि. 2 जुन 2024 रोजीचे 6 वाजेपासून ते दि. 15 जुन 2024 रोजीचे 24 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.