जावरा ते वरुडा परिसरात दोन बिबट्याचा संचार

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.10
तिवसा : तिवसा तालुक्यातील जावरा व वरुडा या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर काल रात्री १२.३० वाचताच्या सुमारास तिवसा महसूल पथक वाळू माफियाच्या शोधात असताना अचानक दोन बिबटे दिसले. या परिसरात नेहमीच बिबट व जंगली जनावरे दिसून येतात. नायब तहसीलदार पंधरे व वाहन चालक राठोड यांना दोन बिबट्याचे काही क्षण दर्शन झाले. त्यामुळे महसूल व वन विभागाच्या वतीने परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोर्शी व चांदुरबाजार हा मार्ग वन विभागाच्या जंगल क्षेत्रानी व्यापला असल्याने या राज्य मार्गावर अनेकदा बिबट व इतर जनावरे काही वेळ रस्त्यावर येतात. तालुक्यातील जावरा, फत्तेपूर, वरुडा, दापोरी या परिसरातील शेतकऱ्यांच्या गाई, बकऱ्याच्या शिकारी सुद्धा बिबट्यानी केल्याच्या घटना घडल्या आहेत. तिवसा महसूलअंतर्गत येत असलेल्या नदी पत्रातून रोज वाळू चोरी होत असल्याने काल नायब तहसीलदार पंधरे यांनी या परिसरात गस्ती घातली.
यावेळी वरुडा दापोरी मार्गाच्या चौफुलीवर दोन बिबट बसलेले दिसून आले. पंधरे यांनी काही वेळ परिसरात फिरून बिबट्या गावाच्या दिशेने गेला का याची खात्री केली. मात्र, त्यानंतर दिसून आला नाही. जावरा ते वरुडा रस्त्यावर दोन बिबट दिसून आल्याने परिसरातील शेतकरी, मजूर व नागरिकांनी सतर्क राहावे. बिबट दिसून आल्यास भयभीत न होता तात्काळ वन विभागास व प्रशासनास कळवावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
भयभीत होण्याची आवश्यकता नाही
पूर्वीपासूनच या भागात बिबट आहे. काल रात्री बिबट दिसल्याने या भागात वन विभागाचे पथक पाठविण्यात आले आहे. भागात बिबट असून त्यांनी मानवी जीवितहानी केलेली नाही. त्यामुळे भयभीत होण्याची आवश्यकता नाही. फक्त मजूर व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे.
– आनंद सूरत्ने,
वनपरिक्षेत्र अधिकारी, मोर्शी, तिवसा
व्हॉट्सॲपला वाघ आढळून आल्याचा मेसेज वायरल
काल रात्री वाळू माफियांच्या मार्गावर असलेल्या तिवसा महसूल पथकाला दोन बिबट दिसून आल्याने प्रशासनाच्या वतीने या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन व्हॉट्सॲपवर मेसेजद्वारे करण्यात आले. मेसेजमध्ये वाघ दिसून आल्याचा उल्लेख असल्याने हा मेसेज व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रचंड प्रमाणात वायरल झाला. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले आहे. मात्र, या भागात वाघ नसल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.