आजी आजोबा दिवस साजरा.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.23
कै गो.ना.अक्षीकर विद्या संकुलातील जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट इंग्लिश मीडियम स्कूल उरण प्री प्रायमरी आणि प्रायमरी यांच्यातर्फे शाळेमध्ये ग्रँड पेरेंट्स डे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जगदीश श्रीधर चव्हाण(सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त ), शाळेचे स्कूल कमिटी चेअरमन सदानंद गायकवाड,माजी उप सभापती वैशाली नीलेश पाटील मुख्याध्यापक लक्ष्मण भोये,मुख्याध्यापिका सानिका फराड,शालेय समिती सदस्य नीला उपाध्ये,सुनंदा कुमार,क्रेडिट सोसायटी अध्यक्ष दिपाली पाटील,क्रेडिट सोसायटी मेंबर जयश्री पाटील,माजी मुख्याध्यापक,शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी-आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी-आजोबांसोबत घालवतात. खरंतर आजी-आजोबा आणि नात किंवा नातू यांचं नातं फार विलक्षण असतं, खास असतं. आजी-आजोबा हे नातवंडांची पहिले मित्र असतात. नात्याची तेव्हा तिथूनच खरी जडण-घडण होत असते. म्हणून आजी-आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणं आजच्या काळात महत्त्वपूर्ण असून हे नातं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचं आणि प्रेरणादायी आहे.शाळेतील अनुभवासह आजी-आजोबांचे अनुभव, त्यांच्या हितगुजातून मिळणारी माहिती या गोष्टी पाल्याच्या जडणघडणीसाठी पोषक ठरतात. त्यामुळे शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी-आजोबांना शाळेत आमंत्रित करुन मुलांशी संवाद, खेळ आणि गप्पा गोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ओळख करण्यासाठी ‘आजी-आजोबा’ दिवस शाळेत साजरा करणं संस्कारपूर्णतेच्या दृष्टीने गरजेचं आहे.मुलांना शाळेबरोबरच आजी-आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्याची नव्याने ओळख होऊन त्याची दृढता होण्यासाठी हा दिवस साजरा होणं आवश्यक आहे.असे मत सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश चव्हाण यांनी व्यक्त केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे आजी आजोबा मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.