pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भरडधान्य जनजागृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन

0 3 1 4 3 1

जालना/प्रतिनिधी,दि.28

 निरोगी शरीरासाठी भरडधान्य (पौष्टिक तृणधान्य) अत्यंत गरजेचे आहे. दररोजच्या आहारात भरडधान्यापासून बनविलेले पदार्थ जरुर खावेत. मीठ, साखर, तेल कमी आरोग्याची हमी. नाचणी/रागी/नागली, वरई, राळा, कोद्रो, सावा, सामा, भगर, ज्वारी, बाजारी, राजगिरा या पौष्टिक तृणधान्याचा जेवणात अवश्य समावेश करावा. मुलांना तृणधान्याचे महत्त्व समजून सांगावे, अशा प्रतिक्रीया भरड धान्य मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या मनोगतातून व्यक्त झाल्या.

जालना शहरातील जेईएस महाविद्यालयाच्या परिसरात अतिशय भव्य प्रमाणात आयोजित दोन दिवसीय भरड धान्य जनजागृती महोत्सवाचा आज थाटात प्रारंभ झाला. महाविद्यालयाच्या मैदानावर सुमारे तीस स्टॉलच्या माध्यमातून भरड धान्य विक्री, खाद्य पदार्थांचे स्टॉल, भरड धान्याचे महत्त्व सांगणारे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी या मेळाव्यास नागरिक, विद्यार्थी यांचा मोठा प्रतिसाद लाभला. प्रत्येक स्टॉलला भेट देणाऱ्यांची मोठी गर्दी होती.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त अन्न व औषध प्रशासन, जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय आणि जालना एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “भरड धान्य जनजागृती महोत्सवा”चे आयोजन करण्यात आले आहे. उदघाटन कार्यक्रमास प्रभारी अपर जिल्हाधिकारी सरीता सुत्रावे, अन्न व औषधी  प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचे सह आयुक्त अर्जुन भुजबळ,  जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर,  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जी.आर. कापसे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दयानंद पाटील, प्रमुख वक्ते शशिकांत बोडखे, जेईएस एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड, कोषाध्यक्ष हेमेंद्र लखोटिया, जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष विनीत सहानी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

श्रीमती सुत्रावे म्हणाल्या की, भरडधान्य शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे. या धान्याची उत्पादकता वाढावी व त्याचा दैनंदिन आहारात समावेश व्हावा, यासाठी शासनाने हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून शासन हे तृणधान्याची मोठया प्रमाणात जनजागृतीही करीत आहे. तृणधान्यामुळे उत्तम आरोग्य राहण्याबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्नातही भर पडेल. मुलांच्या आहारात जास्तीतजास्त तृणधान्याचा वापर करावा. व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांनी  भरडधान्याची विक्री व त्यापासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांच्या विक्रीवर भर द्यावा.

श्री. बगडिया यांनी आठवडयातून एकदा तरी भरड धान्य खावे, असे आवाहन करुन भरड धान्यामुळे शरीर निरोगी राहते, शेतकऱ्यांना भरड धान्यापासून चांगला भाव मिळेल आणि भरड धान्याच्या प्रक्रीया उद्योगातून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होईल अशी त्रिसूत्री सांगितली.

प्रमुख वक्ते शशिकांत बोडखे यांनी भरड धान्य म्हणजे काय, ते किती प्रकारचे आहेत,  त्याचे फायदे, भरडधान्यातून उद्योगाची उभारणी याबाबत अतिशय सविस्तरपणे मार्गदर्शन केले. जुन्या काळात आहारामध्ये भरडधान्याचा मोठया प्रमाणात वापर केल्यामुळे आजाराचे प्रमाण फार कमी होते, असे सांगून ते म्हणाले की, आजच्या जीवनशैलीत मात्र, भरडधान्य फारसे वापरले जात नसल्याने माणुस कुठल्यानकुठल्या आजाराने त्रस्त आहे. उपाचारासाठी सातत्याने त्याला डॉक्टरांकडे जावे लागते. हे सर्व टाळायचे असेल आणि शरीत मजबूत व निरोगी ठेवायचे असेल तर भरडधान्य जरुर खावे, असे आवाहन करुन त्यांनी प्रामुख्याने नाचणी/रागी/नागली, वरई, राळा, कोद्रो, सावा, सामा, भगर या तृणधान्याचे महत्त्व विषद केले. त्याचप्रमाणे तृणधान्याच्या प्रक्रीया उद्योगातून एका मोठा उद्योजक‍ कसे होता येते, याचा मूलमंत्रही उपस्थितांना दिला. आहारात तृणधान्य वापराची प्रतिज्ञा देऊन त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

श्री. भुजबळ यांनी जनतेस सकस व निर्भेळ अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन कशा पध्दतीने काम करते याची माहिती दिली. श्री. कापसे यांनी प्रास्ताविकात तृणधान्याचे  महत्त्व विषद करुन आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाबद्दल माहिती दिली. दयानंद पाटील यांनीही तृणधान्याचे महत्व सांगितले. दैनंदिन आहारात तृणधान्याचा वापर वाढविण्याबरोबरच आहारात मीठ, साखर, तेल कमी आरोग्याची हमी, असा मंत्रही दिला. प्राचार्य डॉ. अग्निहोत्री यांनी भरडधान्य महोत्सवामागील उद्देश स्पष्ट करुन भरडधान्याच्या जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती भाषणातून दिली.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे फित कापून व दीपप्रज्वलनाने उदघाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी विभागाच्या “पौष्टिक तृणधान्य आरोग्याची शिदोरी” या घडीपुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. बाबासाहेब वाघ यांनी केले. तर डॉ. राजेंद्र सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. डॉ. गणेश कुलकर्णी, प्रा. सुषमा दीपवाल यांच्यासह नागरिक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, सकाळी तृणधान्याच्या जनजागृतीसाठी जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विद्यार्थ्यांची भव्य  रॅली काढण्यात आली. महाविद्यालयाच्या परिसरात तृणधान्यापासून विविध पाककृती, तृणधान्यापासून काढण्यात आलेल्या रांगोळी, पोस्टर्सने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. महोत्सवाची वेळ सकाळी 10 ते दुपारी 5.00 वाजेपर्यंत आहेत. दि. 29 डिसेंबर रोजी महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवास जनतेने अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 4 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे