संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनाः बँकांचे खेटे बंद होणार
निराधारांना अनुदान आता डीबीटी मार्फत मिळणार ! अनुदान जमा झाल्यानंतर येणार मोबाईलवर मेसेज लाभार्थ्यांनो मोबाईल, आधार लिंक केला का? निराधार योजनाः लाभार्थ्यांच्या खात्यात थेट डीबीटीमार्फत जमा होणार अनुदान

जालना/प्रतिनिधी,दि. 21
शासनाच्या विशेष सहाय्य कार्यक्रमांअर्तंगत राबविण्यात येणा-या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभार्थ्यांना ठराविक मानधन दरमहा अदा केले जाते. हे मानधन लाभार्थ्यांना तहसिल स्तरावरुन बँकेत पाठवून संबंधिताच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र आता शासनामार्फत सदर अर्थसहाय्याचे वितरण हे डी.बी.टी पोर्टलच्या माध्यमातून
निराधारांच्या थेट खात्यात वर्ग केले जाणार आहे.
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी यापूर्वी तहसिलच्या संजय गांधी योजना विभागामार्फत संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानूसार निधी दिला जात होता, त्यानंतर तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रकियेस विलंब होत होता. त्यामुळे वयोवृध्द लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकांत खेटे घालावे लागत होते. मात्र आता डी.बी.टी पोर्टल निराधारांचे अनुदान थेट बँक खात्यात मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबुन बँक कर्मचा-यांची कसरत थांबणार आहे. त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया जालना जिल्हयातील सर्व 8 तालुक्यांतील संजय गांधी योजना विभागाकडून सुरु करण्यात आलेली आहे. याबाबत गावस्तरावरुन तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळविले जात आहे.
30 मे पर्यंत द्या कागदपत्रे, अन्यथा अनुदान अडकणार- संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी येत्या 30 मे पर्यंत अदयावत आधारकार्ड व मोबाईल क्रमांक (बँकेशी संलग्न असलेले) तलाठी यांच्याकडे देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या मुदतीत आधारकार्ड व मोबाईल क्रमांक न देण्याच्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागेल.
ही द्यावी लागणार कागदपत्रे
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान आता डीबीटीमार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे. यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र, अपडेट आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाईल क्रमांक
आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे जाणार आहेत.
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योनजेच्या लाभार्थ्यांचे दरमहा मानधन आता डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. संबधीत योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक गावातील तलाठ्याकडे किंवा प्रत्यक्ष तहसिल कार्यालयात उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.