जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.23
द्रोणागिरी स्पोर्टस असोसिएशन च्या २४ व्या रायगड जिल्हास्तरिय युवा महोत्सव निमित्त जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय केलेल्या कार्याबद्दल विविध संस्था, संघटनाना, विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना द्रोणागिरी भूषण पुरस्कार देण्यात आले . ह्या वर्षी ३६ द्रोणागिरी भूषण पुरस्कार प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान केले त्यामधे उलवे येथील १० वर्ष समाजसेवेत कार्यरत असलेली जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थेला द्रोणागिरी स्पोर्ट्स असोशिएशनचे अध्यक्ष महादेव घरत आणि माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते द्रोणागिरी भूषण पुरस्कार २०२४ देवून गौरविण्यात आले.
जाणीव संस्था ही रायगड जिल्ह्यातील १ली अंगणवाडी डिजिटल करणारी संस्था आहे.आत्ता पर्यंत ३ अंगणवाड्या डिजिटल केल्या.शिवाय अनेक आदिवासी पाड्यातील अंगणवाडीमधे विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविले.
५० हून अधिक आदिवासी वाडीतील मराठी शाळेतील गरिब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, क्रीडा साहित्य वाटप संस्थेमार्फत केले आहेत. अनेक आदिवासी वाड्यांमधे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप त्याचप्रमाणे गेल्या १० वर्षापासून दरवर्षी हिवाळ्यात आदिवासी वाड्यांमधे ब्लँकेट वाटपाचे कार्यक्रम राबवत असते.
कोल्हापुर महापूरांत ६० हजार रुपये किमतीचे अन्नधान्य वाटप केले. तसेच महाड महापूरात ३० हजार रुपये किमतीचे जीवनावश्यक साहित्य वाटप करुन पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.
गेल्या पाच वर्षापासून प्रत्येक सेवाभावी कार्यक्रमात किमान एक देशी वृक्षरोप लागवड करते. अशा अनेक विविध सामाजिक सेवाभावी कार्य करणाऱ्या या संस्थेला आत्तापर्यंत शिवराज्य एकता युवा मंडळ पारगाव कडून सन्मानित केले गेले. श्री गजानन महाराज मंदिर सेवा ट्रस्ट नेरे कडून समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित तर महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे यांच्यावतीने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या संस्थेचे अध्यक्ष सुनिल ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून उलवे – पनवेल- उरण – खालापूर या विभागातील ५० हून अधिक सदस्य जोडले आहेत त्यात महिला भगिनीही १० वर्षापासून कार्यरत आहेत.
अशा या जाणीव संस्थेला द्रोणागिरी भूषण पुरस्कार देवून गौरविल्याबद्दल सर्वच स्तरातून संस्थेचे व पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहेत.व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.