राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 888 प्रकरणे निकाली; 6 प्रकरणात जोडीने संसार करण्याचा घेतला निर्णय

जालना/प्रतिनिधी,दि. 29
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये एकुण 5 हजार 757 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 596 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून यामध्ये एकुण 12 कोटी 50 लक्ष 46 हजार 132 रुपये रक्कमेची तडजोड करण्यात आली. तसेच दावा दाखल पुर्व 30 हजार 572 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 292 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून यामध्ये एकुण 2 कोटी 51 लक्ष 25 हजार 247 रुपये रक्कमेची तडजोड करण्यात आली. कौटुंबिक न्यायालय, जालना येथील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकुण 6 प्रकरणात सन्मानजनक तडजोड होवून प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणातील जोडप्यांनी परस्परांमधील वाद सामंजस्याने मिटवून घटस्फोटाचा मार्ग सोडून पुन्हा संसार करण्याचा निर्णय घेतला. तरी पक्षकांराच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सदरचे राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली निघाली.
शनिवार दि. 27 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी निर्देशित केल्यानूसार जिल्हा व सत्र न्यायालय, जालना येथे प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तसेच धनादेश अनादर संदर्भातील प्रकरणे, विद्युत प्रकरणे, बँकेची प्रलंबित व दावा दाखलपुर्व वसूली प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, बी.एस.एन.एल ची दावा दाखल पुर्व प्रकरणे यासाठी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतसाठी जिल्ह्याच्या मुख्यालयी 8 पॅनल ठेवण्यात आले होते. त्यावर पॅनल प्रमुख म्हणुन सर्व न्यायाधीशांनी काम पाहिले तर पॅनल सदस्य म्हणून विधीज्ञांनी काम पाहिले. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष वर्षा मोहिते, जिल्हा न्यायाधीश-1 ए.जी. जोशी, व सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ, तसेच सर्व न्यायाधीश, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष विकास पिसुरे, सर्व विधिज्ञ, जिल्हा सरकारी अभियोक्ता व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.