आला उन्हाळा….तब्येत सांभाळा…!

जालना/प्रतिनिधी,दि.20
दरवर्षी माहे एप्रिल व मे या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होऊन मृत्यु होणे संभवनीय असते. या कालावधीमध्ये तापमान प्रथमता हळुहळु किंवा एकदम कोणत्याही प्रकारची वाढ होत असते. उष्माघाताने मृत्यु होऊ नये या साठी आपण जागरुक राहीले पाहीजे, तरी उष्माघात होऊ नये म्हणुन जिल्ह्यातील नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
उष्णतेच्या लाटेचा त्रास कोणत्या व्यक्तींना होण्याची शक्यता अधिक आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
१. उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक.
२. वृध्द लोक आणि लहान मुले.
३. स्थुल लोक, अयोग्य कपडे घातलेले लोक, पुरेशी झोप न झालेले लोक
४. गरोदर महीला
५. अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग असलेले लोक, अपस्मार रुग्ण, दारुचे व्यसन असलेले लोक.
६. काही विशिष्ट औषधी घेत असलेले लोक
७. निराश्रित, घरदार नसलेले लोक.
या अतिजोखमीच्या लोकांची उष्णतेच्या लाटेसंदर्भात विशेष काळजी घेतली पाहीजे. उष्णतेमुळे होणारा शारीरीक त्रास मुख्यत्वे किरकोळ स्वरुपाचा त्रास किंवा गंभीर स्वरुपाचा त्रास या प्रकारचा असतो. किरकोळ त्रासात उष्णतेमुळे शरीरावर रॅश उमटने, हातापायाळा गोळे येणे, चक्कर येणे अशा स्वरुपाचा असतो तर गंभीर प्रकारात उष्माघाताचा समावेश होतो. यामध्ये व्यक्तीची मृत्यु देखील होऊ शकतो.
उष्माघात होऊ नये म्हणुन – हे करा
१. पुरेसे पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा
२. हलक्या वजनाचे फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरा, उन्हात गॉगल, छत्री, पादत्राने वापरा.
३. उन्हात जातांना टोपी/हॅट खाली ओलसर कपडा ठेवा
४. पाळीव प्राण्याना सावलील, थंड ठिकाणी ठेवा
५. ओलसर पडदे, पंखा कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.
हे करु नका
१. शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.
२. कष्टाची कामे उन्हात करु नका.
३. पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवु नका.
४. गडद रंगाचे तंग कपडे वापरु नका.
५. उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा, स्वयंपाक घर हवेशीर ठेवा.
६. मद्य, चहा, कॉफी, सॉप्ट ड्रिंक्स टाळा
७. खुप प्रथिनयुक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.