निवडणूक निरीक्षक वेद पती मिश्र आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली मतमोजणी केंद्र व मतदान केंद्राची पाहणी
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्या दिल्या सूचना

जालना/प्रतिनिधी,दि.13
101 जालना आणि 102 बदनापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री. वेद पती मिश्र आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज मतमोजणी केंद्र आणि मतदान केंद्राना भेट देवून पाहणी केली.
यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, 101 जालना विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार छाया पवार तर 102 बदनापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सरिता सुत्रावे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अश्विनी डमरे आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी श्री. मिश्र आणि डॉ. पांचाळ यांनी 101 जालना विधानसभा मतदारसंघातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि 102 बदनापूर विधानसभा मतदार संघातील कृषि महाविद्यालय येथील मतमोजणी केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी होणाऱ्या मतदानासाठी मतदान यंत्रे (इव्हीएम) सज्ज करण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी त्यांनी उमेदवारांच्या नावासंदर्भात तपासणी करत एका मशीनवर ‘मॉकपोल’ करून व्हीव्हीपॅटद्वारे दिसणाऱ्या चिठ्ठीचीही खात्री करुन घेतली. तसेच स्ट्रॉन्ग रुमला भेट देवून रॅन्डमझायशेन प्रक्रियेनुसार मतदान यंत्रे (इव्हीएम) असल्याची देखील त्यांनी खात्री करुन घेतली.
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने निवडणूक निरीक्षक श्री. मिश्र आणि जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी मतमोजणी कक्षात करण्यात आलेल्या पुर्वतयारीची देखील यावेळी पाहणी केली. तसेच मतमोजणी कक्षातील मतमोजणी कर्मचारी आणि पोलींग एजंट यांच्या बैठक व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मतमोजणी केंद्रातील संपूर्ण परिसरात सीसीटीव्हीची व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
यावेळी श्री. मिश्र आणि डॉ. पांचाळ यांनी यावेळी 101 जालना विधानसभा मतदारसंघातील जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातील मतदान केंद्र आणि 102 बदनापूर विधानसभा मतदारसंघातील सेलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रास भेट देवून पाहणी केली. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार केंद्रावर आवश्यक त्या सोयी-सुविधांचे नियोजन करण्याच्या संबंधीतांना मार्गदर्शक सूचना दिल्या.