जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आवाहन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नये

जालना/प्रतिनिधी,दि. 29
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पोर्टल वर जालना जिल्ह्यात मोठ्या संख्येने अर्जाची नोंदणी होत आहे. परंतु अर्जांची छानणी करतांना असे निदर्शनास येत आहे की, काही मोजक्याच लोकांकडून आधार कार्डवर जन्म तारीख बदलणे, शाळा सोडल्याचा दाखल्यामधील जन्म तारीखेत खाडाखोड करणे, रेशन कार्ड वर स्वत:च्या हाताने नाव टाकणे, इत्यादी बाबी निदर्शनास येत आहेत.तरी अशा विविध प्रकारे प्रशासनाची दिशाभूल करु नये. तसेच काही खाजगी कम्प्युटर सेंटर, कॅफे सेंटर, आपले सेवा सरकार केंद्र, सेतु सुविधा केंद्रावरुन अशा प्रकारे प्रशासनाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.
नारी शक्ती दुत ॲपवरील ज्यांचे फॉर्म डिसअप्रुड झालेले आहेत त्यांनी ते फॉर्म त्रुटीची पुर्तता करुन नारी शक्ती दुत ॲपवर पुन्हा दाखल करावेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पोर्टलवरुन प्रोव्हीझनली डिसअप्रुड झालेले अर्ज सुध्दा त्रुटीची पुर्तता करुन दाखल करावेत. जेणेकरुन त्यांच्या अर्जाची पडताळणी करुन पात्र लाभार्थ्यांना तातडीने लाभ देणे सोईचे होईल व कोणताही पात्र लाभार्थी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही. असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.