उरण तालुक्यात एनएमएमटीची सेवा सुरु करण्याची जनतेची मागणी.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25
रायगड जिल्ह्यात समुद्र किनारी असलेल्या उरण तालुका औद्योगिक दृष्ट्या अति महत्त्वाचा तालुका आहे. उरण तालुक्यात औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. उरण तालुक्यात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथील स्थानिक नागरिक नोकरी धंदा,व्यापार तसेच शिक्षणासाठी उरण बाहेर प्रवास करीत असतात. उरण मध्ये येण्यासाठी तसेच उरण मधून बाहेर इतर ठिकाणी जाण्यासाठी प्रवासाचे सर्वात चांगले व सुरक्षित व विश्वसनीय सेवा म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेकडे बघितले जाते. मात्र २२ फेब्रुवारी २०२४ पासून उरणच्या नागरिकांना, प्रवाशी वर्गाला कोणतेही पूर्व सूचना न देता नवी मुंबई महानगरपालिकेच्या आणि नवी मुंबई मुनिसिपल ट्रान्सपोर्ट विभागाने अचानक उरण तालुक्यातील सेवा बंद केले आहे. कोपरखैरणे ते उरण ३१ नंबर, कळंबोली ते उरण ३० नंबर,जुईनगर ते वशेणी ३४ नंबर अशी सेवा उरण मध्ये सुरू होती.मात्र काही दिवसांपूर्वी खोपटे येथे बसने अपघात केला.यात एकाचा मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले होते. तेव्हा बस ड्रायवरला (वाहन चालकाला) एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. तसेच त्या वाहन चालक व ग्रामस्थांमध्ये वाद झाला होता. या घटनेत ड्रायव्हर (वाहन चालक )हा दारू पिऊन वाहन चालवत होते असे ग्रामस्थांनी आरोप केला होता.अपघात झाल्यानंतर वाहन चालकाला मारहाण झाल्यानंतर एनएमएमटीच्या सर्व ड्रायव्हर कंडक्टर तसेच कर्मचाऱ्यांनी संप सुद्धा केला होता. या घटनेची गंभीर दखल घेत तसेच एन एम एम टी प्रशासनाने बसेसचे चालक व वाहक यांची सुरक्षा लक्षात घेता उरण मधील एनएमएमटीची सेवा बंद केली आहे. नवी मुंबई मधून ३०,३१, ३४ या क्रमांकाचे बसेस उरण साठी सोडल्या जातात.उरण मार्गावर दिवसभरात सुमारे ७००० हुन अधिक प्रवाशी प्रवास करतात. आता मात्र अचानकपणे एनएमएमटीची सेवा बंद झाल्याने याचा फटका उरण मधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.उरण मधून व्यापार नोकरी करता तसेच शिक्षणासाठी वाशी नेरुळ बेलापूर आदी नवी मुंबईमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. मात्र एनएमएमटीची सेवा बंद झाल्याने या सर्व नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.एनएमएमटीचे बस बंद असल्याने प्रवाशांना टॅक्सी , कार, रिक्षा अशा खाजगी वाहनातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. खाजगी वाहने अनेकदा रस्ते वाहतुकीचे नियम पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे खाजगी वाहनांचे अनेकदा अपघात झाले आहे. त्या अपघातात मृत्यू देखील झाले आहेत.शिवाय खाजगी वाहने मनमानी कारभार करत प्रवासासाठी कितीही पैसे घेत आहेत त्यामूळे याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वे पैसे दोन्ही अधिक खर्च करावा लागत आहे.हाच वेळ व पैसा एनएमएमटीच्या बसने प्रवास करून वाचत होता. उरण मध्ये रेल्वे सेवा सुरु झाली मात्र अर्धा तासाने किंवा एक तासाने एक फेरी असल्याने अनेक प्रवाशी रेल्वेने प्रवास करीत नाहीत.शिवाय महत्वाच्या अनेक ठिकाणी रेल्वे सेवा उपलब्ध नाही त्यामूळे प्रवाशांची गोची झाली आहे. महामंडळच्या बस आगाराची सेवा निकृष्ठ दर्जाची आहे. दर एक तासाने किंवा दर दोन तासाने एक फेरी बसची होते. त्यामुळे मधला वेळ प्रवाशांचा फूकट जातो.महामंडळच्या बसेसच्या फेऱ्या अपुऱ्या आहेत. त्यामूळे जनता महामंडळाच्या बसने कमी प्रवास करतात.उरणमध्ये अजूनही दळणावळणाच्या पाहिजे तशा सेवा नाहीत. त्यामुळे अचानकपणे बंद केलेली एनएमएमटी बसच्या सुविधा पुन्हा सुरू कराव्यात, उरण तालुक्यात एनएमएमटीचे बस सुरू कराव्यात अशी मागणी उरणच्यातून जनतेतून होऊ लागली आहे.उरण मधील सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र आल्यास ही समस्या नक्कीच सुटणार आहे यात काही वाद नाही.मात्र त्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहेत.