शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रति लिटर रु. 5 तर दूध भुकटी निर्यातीस रु. 30 प्रति किलो प्रोत्साहन अनुदान
जालना/प्रतिनिधी,दि.10
राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ / खाजगी प्रकल्प यांना गाय दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर रुपये 5/- आणि दूध भुकटी निर्यातीस रु.30/- प्रति किलो प्रोत्साहन अनुदान देण्याचा शासन निर्णय दि. 5 जुलै 2024 रोजी निर्गमीत करण्यात आला आहे. त्यानुसार सदर अनुदान योजना दि.1 जुलै 2024 ते दि.30 सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागामार्फत संयुक्तरित्या राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने संबंधीत संघ व खाजगी प्रकल्प यांनी 3.5 फॅट/8.5 एस.एन.एफ या गुणप्रतिच्या दुधासाठी प्रति लिटर 30/- रुपये दर देणे आवश्यक आहे. 3.8/8.5 या गुणप्रति पेक्षा कमी / जास्त होणाऱ्या फॅट व एस.एन.एफ. साठी प्रत्येको 30 पैसे वाढ/वजावट करणे आवश्यक आहे.
सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष सॉफटवेअर तयार करण्यात आले असून अनुदान पात्र गाय दुधासाठीचे प्रति लिटर रुपये 5/- अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डिबीटीव्दारे जमा करण्यात येणार आहे. डिबीटी करण्यासाठी दुध उत्पादक शेतक-यांचे बँक खाते आधार कार्ड व ईएआर टॅगशी जोडलेले असणे तसेच त्याची आयएनएपीएच (INAPH) / भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे.
जालना जिल्हयातील सहकारी दूध संघ व खाजगी प्रकल्प शितकरण केंद्रे आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी यांना योजनेत सहभागी होण्याकरिता अर्ज सादर करावेत. शासनाच्या रु. ५/- अनुदान योजनेपासून जालना जिल्हयातील सहकारी संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणारे एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये, यासाठी सर्व दूध उत्पादक शेतक-यांनी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाशी संपर्क साधावा, सहकारी संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतक-यांनी गाय/म्हैस यांचे ईएआर टॅगींगबाबत काही अडचण असल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.
सदर योजनेतंर्गत कोणताही पात्र दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहु नये, यासाठी संगणक प्रणालीमध्ये दूध उत्पादक शेतक-यांचा डाटा भरणा-या सहकारी दूध संघ व खाजगी दुध प्रकल्पांना प्रोत्साहनपर प्रतिलिटर रु0.05/- पैसे देण्यातबाबत शासनाने निर्णय जाहिर केला आहे, असे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.