कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयामध्ये जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयांमध्ये जागतिक ग्राहक हक्क दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन आजीवन अध्ययन व विस्तार विभागा मार्फत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. पी. आर. कारूळकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये विक्रेत्याकडून काही फसवणूक होत असल्यास ते निमूटपणे सहन न करता त्याच्यावरती दाद मागितली पाहिजे. ग्राहकांचे हक्क आणि जाणीव याविषयी आपण जागृत राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या प्रस्तावनानंतर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सरस्वती प्रार्थना गायली. महाविद्यालयाचे काही विद्यार्थी त्यामध्ये खुशी शर्मा, मोहिते तनिषा, घमरे तनवी, गुप्ता अंजली आणि चव्हाण साक्षी या विद्यार्थिनींनी जागतिक ग्राहक हक्क दिवसाच्या निमित्ताने आपली मनोगते व्यक्त केली. सदर मनोगते मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमधून अतिशय उत्कृष्टपणे मांडली होती.यानंतर डॉ.एच.के.जगताप यांनी जागतिक ग्राहक हक्क दिवसाचे महत्त्व आणि आपल्या जबाबदाऱ्या याविषयी मनोगत व्यक्त केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.जी.लोणे यांनी ग्राहकांची कशी फसवणूक होते, आणि ती आपण कशी टाळली पाहिजे याच्या विषयी मार्गदर्शन केले. यानंतर आयोजक आजीवन शिक्षण विभागाचे प्रमुख ज्येष्ठ प्रा. व्ही. एस. इंदुलकर यांनी आभार व्यक्त केले.आभार व्यक्त करताना त्यांनी ग्राहकांच्या जबाबदाऱ्या, ग्राहकांनी कोणत्या प्रकारे वस्तू खरेदी कराव्यात, होणारी आपली पिळवणूक कसे थांबवावे याविषयी जागृती होण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आपण नेहमी ऐकत राहिले पाहिजे. तसेच ग्राहकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या, सामाजिक जनजागृती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमामध्ये प्रा. आर. टी. ठवरे प्रा. जे.के. कोळी प्रा. हन्नत शेख, प्रा. पूजा गुप्ता, प्रा. निलोफर मॅडम इत्यादी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती पाटील या विद्यार्थिनीने सुरेख आणि उत्कृष्ट केले.