आगामी सण, उत्सव सलोख्याने व शांततेत साजरे करावेत -जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ
जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न

जालना/प्रतिनिधी,दि.6
जिल्ह्यात आगामी काळात विविध श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद या सारखे सण, उत्सव साजरे होणार आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आगामी सण, उत्सव सलोख्याने व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात जिल्हा शांतता समितीची बैठक दि.6 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता पार पडली. यावेळी अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, पोलिस उपअधिक्षक अनंत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, जालना जिल्ह्याला शांततेत सण, उत्सव साजरे होण्याची पार्श्वभूमी आहे. ती कायम राखत सण, उत्सवात ते अतिशय आनंदाने साजरे करावेत. जालना जिल्ह्यातील सर्व धर्मीय नागरिक अतिशय सलोख्याने राहत असतात. जिल्ह्यातील नागरिकांनी मागील काळात वेळोवेळी शांततेच्या मार्गाने आंदोलने, मोर्चे काढून प्रशासनाला निवेदन देत एक आदर्श समोर ठेवला आहे. श्री गणेश मिरवणूकीच्या मार्गावरील चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. लग्न समारंभात फोटोग्राफी व व्हीडीओग्राफी करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर वाढला आहे. तसेच अज्ञात ड्रोनबाबत तपास सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरुन जावू नये. ड्रोनमुळे कोणताही धोका उदभवणार नाही. जिल्ह्यात विविध जाती, पंथातील नागरिक दोन बंधूप्रमाणे वर्तन करतात. त्यामुळे यापुढेही सामजस्यांचे, धार्मिक सलोख्याचे वातावरण आगामी उत्सवात देखील राखला जाण्यासाठी प्रशासनाकडून समन्वय राखला जाईल. आगामी सण, उत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबविले जावून उत्सवांना सामाजिक उपक्रमांची सांगड घालावी, असेही त्यांनी सांगितले.
अपर पोलिस अधिक्षक श्री.नोपाणी म्हणाले की, आगामी श्री गणेश उत्सवात मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच चोवीस तास गणेश मंडळाचा एक स्वयंसेवक परिसरात नेमावा. श्री गणेश विर्सजनाच्या दिवशी व सर्व कालावधीत मा.सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली वाद्य तसेच आवाजाची व वेळेची मर्यादा पाळावी. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका तसेच कोणतीही संदिग्ध पोस्ट शेअर, लाईक करु नये. श्री गणेश मिरवणूकीवर पोलिस विभागाकडून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस शांतता समिती सदस्य, विविध श्री गणेश मंडळाचे पदाधिकारी, मुस्लीम समाज बांधव, महिला व युवक, संबंधित विभागाचे कार्यालयप्रमुख आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.