
0
3
1
2
9
7


जालना/प्रतिनीधी,दि.24
राज्य शासन आणि प्रशासकीय पातळीवर मागील तीन वर्षात मोठा संघर्ष करून जालन्यासाठी मंजूर करून आणलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यावर्षी कोणत्याही परिस्थितीत सुरू झाले पाहिजे अशी आपली भूमिका असून याबाबत येत्या २७ जूनपासून सुरू होत असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आ. कैलास गोरंटयाल यांनी सांगितले.
जालना तालुक्यातील अंबड रोडवर असलेल्या गणेश नगर मध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चित करण्यात आलेली जागा तसेच या शैक्षणिक वर्षापासून १०० विद्यार्थी क्षमतेचे कॉलेज सुरू करण्यासाठी ग्लोबल कॉलेज, जिल्हा सरकारी रुग्णालय आणि महीला व बाल रुग्णालय या ठिकाणी जागेची चाचपणी करण्यासाठी इंडीयन मेडिकल काऊंसिलच्या वतीने जालना दौऱ्यावर आलेल्या डॉक्टरांच्या एका पथकाने आज केली आहे. या पथकात हिमाचल प्रदेश येथील जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजचे डॉ. सुंदरसिंग डोग्रा, उदमपुर येथील एन. टी. मेडिकल कॉलेजचे डॉ. मोहम्मद आसिफ, डॉ.निशांत सहाय पाटणा, डॉ.सुनीलकुमार आर्य गोरखपूर यांचा समावेश होता. त्यांच्या समवेत जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. सुधीर चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती. सदर पथकाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेची तसेच कॉलेज सुरू करण्यासाठी जागेची पाहणी केल्यानंतर पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टरांनी हॉटेल अंबर येथे जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आ. गोरंटयाल यांनी पथकातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलतांना आ.कैलास गोरंटयाल म्हणाले की, जालना येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे यासाठी आपण मागील तीन वर्षांपासून शासनाशी संघर्ष करत आहे. विधिमंडळाच्या विविध अधिवेशनात देखील आपण त्यासाठी वेळोवेळी आवाज उठवून सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले. आपल्या या मागणीची दखल घेऊन अखेर राज्य सरकारने जालना येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिली. मात्र, मंजुरीनंतरही जागा निश्चितीसाठी अनेक अडथळे निर्माण झाले होते. मात्र, आपण हार न मानता आपला संघर्ष सुरू ठेवला. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून अखेरीस जालना – अंबड रोडवरील गणेश नगर येथे असलेली शासकीय जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चित करण्यात आली. एव्हढेच नव्हे तर या महाविद्यालयासाठी सुमारे ४०४ कोटी रुपयांचा निधी देखील राज्य सरकारकडून उपलब्ध करून घेतला असल्याचे सांगून आ.कैलास गोरंटयाल म्हणाले की, चालू शैक्षणिक वर्षापासून १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे कॉलेज सुरू व्हावे यासाठी देखील आपण राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असून त्याच अनुषंगाने आज सोमवारी इंडीयन मेडिकल काऊन्सिलच्या वतीने वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टरांच्या पथकाने जालना दौऱ्यावर येत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजित जागेसह तात्पुरत्या स्वरुपात कॉलेज सुरू करण्यासाठी तीन जागांची चाचपणी केली आहे. १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे कॉलेज याच शैक्षणिक वर्षापासून सुरू व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील असून आता जून महिना संपत आला असून जुलै महिना लवकरच सुरू होणार आहे. येत्या २७ जूनपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात याबाबत आपण आवाज उठवणार असून कॉलेज सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका घेणार असल्याचे आ.कैलास गोरंटयाल यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी नंदकिशोर जांगडे, दीपक भुरेवाल, राम सावंत, महावीर ढक्का, दिलीप मोरे, अरुण मगरे, विजय इगेवार, अशोक भगत, दत्ता पाटील, गोपाल चित्राल आदींची उपस्थिती होती.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
3
1
2
9
7