पागोटे येथे १९८४ च्या शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना वाहिली आदरांजली

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17
उरण तालुक्यातील दास्तानफाटा येथे शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी १७ जानेवारी १९८४ रोजी शेतकऱ्यांनी सिडको विरोधात लढा उभारला होता. गौरवशाली व शौर्यशाली शेतकरी लढ्यात आपल्या न्याय्य हक्कांसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या
हुतात्मा कमळाकर कृष्णा तांडेल,महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील पिता पुत्रासह पागोटे येथील तीन हौतात्म्य पत्करलेल्या शूरवीरांचा हुतात्मा स्मृती दिन १७ जानेवारी २०२४ रोजी पागोटे येथे पागोटे ग्रामस्थांच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी एन.सी.सी.विद्यार्थ्यांच्या पथकाने हुतात्म्यांना सलामी देऊन मानवंदना दिली.हुतात्मे अमर है, हुतात्म्यांचे रक्त वाया जाणार नाही,हुतात्म्यांचे रक्त वाया जाऊ द्यायचे नसते असे स्वर्गीय माजी खासदार दि.बा.पाटील यांच्या ब्रीद वाक्यासह वंदे मातरम,भारत माता की जय अशा जयघोषात मान्यवरांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांच्या साक्षीने १७ जानेवारी १९८४ च्या आंदोलनातील प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मानवंदना देऊन आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी ,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार मनोहर भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील उद्योजक जे.एम.म्हात्रे, काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत,राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील,
जेएनपीटीचे कामगार विश्वस्त रविंद्र पाटील कामगार नेते कॉ.भूषण पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर,उरण तालुका शेकाप चिटणीस विकास नाईक,माजी सभापती नरेश घरत,पागोटे सरपंच कुणाल पाटील,दि बा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील,पागोटे चे माजी सरपंच ऍड भार्गव पाटील,महादेव बंडा यांच्यासह हुतात्म्यांचे नातेवाईक, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि पागोटे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.