जनतेने आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळावे-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
जालना/प्रतिनिधी,दि.7
धावपळीच्या जीवनात प्रत्येकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आरोग्यदायी जीवनाकडे वळण्याची गरज आहे. फन रनर्स ग्रुप मॅरेथॉनचे आयोजन करून आरोग्याप्रती करत असलेली जनजागृती निश्चितच कौतुकास्पद आहे. या ग्रुपतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या मॅरेथॉनला जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहणार असून जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
जालना येथील फन रनर्स ग्रुपच्यावतीने येत्या 17 डिसेंबर 2023 रोजी शहरातील मंठा चौफुलीपासून 5 आणि 10 किलोमीटर अशा दोन गटात “जालना फन रनर्स मॅरेथॉन”चे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते आणि अपर जिल्हाधिकारी रिना मैत्रेवार व निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅरेथॉनच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.
याप्रसंगी मॅरेथॉनचे आयोजक फन रनर्स ग्रुपचे डॉ. संजय आंबेकर, अरुण अग्रवाल, केदार मुंदडा, डॉ. राजन उढाण, आदेश मंत्री, डॉ. अनिल शिंदे, डॉ. किशन खिल्लारी, राजकुमार दायमा, डॉ. राजीव जेथलिया आदींची उपस्थिती होती.
डॉ. संजय आंबेकर म्हणाले की, आरोग्यप्रती जनतेने जागृत व्हावे, त्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळावे हा उद्देश समोर ठेवून सन 2017 पासून जालना फन रनर्स मॅरेथॉन आयोजित केली जात आहे. चालणे आणि धावण्यातून सर्वांग व्यायाम होतो. जनतेने मोठ्या संख्येने जालना फन रनर्स मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन फन रनर्स ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.