घारापुरी बेटाच्या अस्मितेला धक्का लागणार नाही : पर्यटकांच्या सुरक्षेची दक्षता घ्यावी: मोरा व पोनि यांचे आढावा बैठकीत आवाहन

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17
जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी लेण्यांची युनोस्कोत नोंद झाली आहे.त्यामुळे त्यास कोणत्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये यासाठी येथे काम करीत असलेल्या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बडगुजर यांनी मंगळवारी (दिनांक १७) बेटावर आयोजित बैठकीतुन केले.
येऊ घातलेल्या नाताळ व नवीन वर्षाचे स्वागताच्या निमित्ताने घारापुरी बेटावर मोठ्या संख्येने पर्यटक येतात.बेटावर येणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही.याची दक्षता घेण्यासाठी मंगळवारी (दिनांक १७) मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक बोलावण्यात आली होती.या बैठकीत मेरी टाईम बोर्डचे सहा.बंदर निरीक्षक विनायक करंजे, गेट वे ऑफ इंडिया मुंबई जलवाहतूक संघटनेचे सुहान ईस्माईल मुल्ला, भारतीय पुरातत्व विभागाचे प्रविण कोळी, घारापुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर, सदस्य सचिन लाड, घारापुरी लघुउद्योजक प्रतिनिधी सचिन म्हात्रे,शांताराम म्हात्रे,हाॅटेल व्यवसायिक प्रतिनिधी शेखर पडते, संतोष कोळी,लोकल गाईडचे प्रतिनिधी प्रेमानंद शेवेकर, भारतीय पुरातत्व विभाग सिक्युरिटीचे अजय झा,आदी प्रमुख उपस्थित होते.विविध शासकीय विभागाचे १८ प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ सहभागी झाले होते.
या बैठकीत मार्गदर्शन करताना वपोनि बडगुजर यांनी पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रत्येक संबंधित विभागाने आपापली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडावी. प्रामुख्याने पर्यटक ज्या प्रमाणे सुखरूपपणे आणले त्याच पध्दतीने त्यांना सुखरूपपणे पोहोचविण्यासाठी आपण सर्वच शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून काम करण्याचे आवाहन केले. कुठलेही अनुचित प्रकार घडणार नाही. याचीही प्रत्येकाने दक्षता घेण्याची जाणीवही त्यांनी करून दिली.