जालना/प्रतिनिधी,दि.26
जालना जिल्ह्यातील शासकीय कार्यालयामध्ये दि. 26 जानेवारी पासून प्लास्टिकचा वापर बंद करण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले. याकरीता पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संयुक्त स्वाक्षरीने या अभियानाचे जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे परिपत्रक आज जारी करण्यात आले.
आजच्या काळात प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण झालेले पर्यावरणीय असंतुलन ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. वायुप्रदुषण, मृदाप्रदुषण याला प्लास्टिकचा अतिवापर जबाबदार आहे. तसेच प्लास्टिकच्या वापरामुळे मानवी आरोग्यावर सुध्दा विपरित परिणाम झालेला दिसून येतो. जसे की, कॅन्सर, अस्थमा, विविध त्वचारोग असे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. प्लास्टिकचा वापर कमी केल्यास जैवविविधता, जलचक्रांचे संरक्षण होऊन पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होणार आहे.
यासाठी जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पाण्याच्या बॉटल, प्लास्टिक वापरलेले पुष्पगुच्छ,प्लास्टिक ग्लास, कॅरीबॅग, तसेच इतर प्लास्टिक वस्तुंचा वापर बंद करुन इतर पर्यायी वस्तुंचा वापर
करावा. यापुढे जालना जिल्हाधिकारी कार्यालयात प्लास्टिक च्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर बंद करून स्टील च्या बाटल्यांचा वापर करण्यात येणार आहे.