मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी 31 ऑगस्टपर्यंत केली तरीही लाभ जुलैपासून मिळणार – पालकमंत्री अतुल सावे

जालना/प्रतिनिधी, दि.16
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेवटच्या पात्र महिला लाभार्थ्यांपर्यत योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी नोंदणीवर भर देण्यात यावा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत केली तरीही लाभ 1 जुलैपासून देण्यात येईल, अशी नि:संदिग्ध ग्वाही राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी बैठकीत दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्हास्तरीय समितीची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. तरी या ॲपवर उदभवणाऱ्या तांत्रिक समस्या तातडीने सोडविण्यासाठी जबाबदार तंत्रस्नेहीची नेमणूक करण्यात यावी. नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका, महिला व बाल कल्याण विभागासह अंगणवाडी सेविकांचे सहाय्य घेवून त्यांना प्रती दिन उद्दीष्ट देवून ग्रामीण भागातील शेवटच्या पात्र महिलेची नोंदणी करण्यात यावी. पात्र महिलांच्या नोंदणीचे काम शासकीय यंत्रणेकडून 100 टक्के होण्यासाठी वेळोवेळी आढावा घेवून दक्षता घ्यावी तसेच वेळोवेळी लोकप्रतिनिधींचे सहकार्यही घेण्यात यावे. ज्या अंगणवाडी सेविका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आपल्या उद्दीष्टपूर्तीसह उत्कृष्ट काम करतील त्यांचा सन्मान येत्या प्रजासत्ताक दिनी करण्यात येईल. असेही त्यांनी सांगितले. तसेच पाऊस, पिक विमा, खते, बि-बियाणे या कृषी निविष्ठांची परिस्थिती जाणून घेतली.
सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी नारी शक्ती दूत ॲपवरील बाबी अधिक सुस्पष्ट करण्यात आलेल्या असून लाभार्थ्यांची अडचण होवू नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात आज रोजीपर्यंत जवळपास 70259 अर्ज जमा झाले आहेत तसेच ऑनलाईन 24112 अर्ज आले असल्याचे सांगून जिल्हास्तरीय समितीच्या कार्यकक्षा, विविध विभागांना नेमून दिलेली कामे, बैठका, प्रशिक्षण, अर्जाची स्थिती, केंद्र, शिबीरे आदिची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे उपलब्ध करुन दिली.