दूध भेसळ रोखण्यासाठी तपासणी करण्याचे निर्देश

जालना/प्रतिनिधी,दि. 7
दुधातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हयातील दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणारे सर्व परवानाधारक, वितरक, दुकान, स्टॉल इत्यादींना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणीत भेसळ आढळल्यास कार्यवाई करण्याचे निर्देश जिल्हास्तरीय दूध भेसळ समितचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी दिले आहेत.
दुधातील भेसळीमुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त दर मिळत नाही. तसेच दुध भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. राज्यातील जनतेला स्वच्छ व गुणवत्तापूर्ण दुधाचा पुरवठा होण्याच्या अनुषंगाने दूध व दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी शासन निर्णयअन्वये शासनाने जिल्हास्तरावर समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हयाचे अपर जिल्हाधिकारी यांना घोषीत केले आहे. तसेच अपर पोलिस अधिक्षक जालना, सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन, जालना, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जालना, उपनियंत्रक वैद्यमापनशास्त्र, जालना हे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी हे काम पाहतात.
दूध भेसळ रोखण्याच्या अनुषंगाने जालना जिल्हयातील विविध दूध व दुग्धजन्य पदार्थ यांचे एकूण 44 नमुने घेण्यात येवुन तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी 38 नमुने प्रमाणित आले असून 3 नमुने कमी दर्जाचे आले असल्याने दंडात्मक कारवाईसाठी वरीष्ठ कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. उर्वरित 3 नमुन्याचे अहवाल प्रलंबित आहेत.
दरम्यान, दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समितीच्या बैठकीत दूध व दुग्धजन्य पदार्थांबाबत जिल्हयातील सर्व प्रकारच्या परवानाधारक/वितरक/दुकान/स्टॉल इत्यादी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन भेसळीबाबत कार्यवाई करण्याचे निर्देश समिती अध्यक्षांनी दिले आहेत.