31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी

जालना/प्रतिनिधी,दि.30
जालना जिल्हयात सदानंद महाराज, विश्रांती मठ, नाव्हा/धारकल्याण यांची 118 वी पुण्यतिथी दि. 7 फेब्रुवारी 2024 रोजी साजरी होत आहे. त्या अनुषंगाने दि. 31 जानेवारी 2024 पासून ते दि. 9 फेब्रुवारी 2024 या कालावधीत यात्रा भरते व मोठया संख्येने भाविकांची दर्शनासाठी गर्दी राहते.
सध्या विविध संघटनांकडून मागण्यांसाठी संभाव्य आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि. 31 जानेवारी 2024 रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.
तसेच अपर जिल्हादंडाधिकारी यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे. हा आदेश कामावरील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे