pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मतदानाच्या जनजागृतीसाठी व्यापारी, उद्योजक, डॉक्टरांचा सहभाग आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

- कर्मचाऱ्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे - मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना अवश्य सुटी द्यावी - लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी व्हावे - मतदान केंद्र आवश्यक सुविधांनी राहणार सज्ज

0 1 7 8 6 7

जालना/प्रतिनिधी,दि.7

जालना लोकसभा मतदारसंघासाठी दि. 13 मे रोजी मतदान होणार आहे.  लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी या दिवशी मतदानाचा हक्क अवश्य बजवावा. शहरातील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर्स यांनी लोकशाहीच्या या उत्सवात  उर्त्स्फूपणे सहभागी होऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्याबरोबरच मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. तसेच आपल्या आस्थापनेवरील सर्व कामगारांना मतदानासाठी आवर्जुन सुटी द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

मतदानाच्या जनजागृती उपक्रमातंर्गत आज शहरातील व्यापारी, उद्योजक, रुग्णालयांचे संचालक, हॉटेल व्यावसायिक यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. सरनीकर, व्यापारी संघ असोशिएशनचे सतिष पंच, उद्योजक सुनिल रायठठ्ठा, घनश्याम गोयल आदींसह शहरातील प्रतिष्ठित उद्योजक, व्यापारी, डॉक्टर्स, हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात समाजातील सर्व घटकांचा समावेश राहावा याकरीता जिल्ह्यात प्रभावीपणे मतदार जनजागृती मोहिमेची अंमलबजावणी केली जात आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, मतदान करणे हा सर्व मतदारांचा मुलभूत अधिकार आहे. तो त्यांनी आवर्जुन बजवावा. लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी उर्त्स्फूतपणे सहभागी व्हावे. येत्या 13 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर मतदारांसाठी मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पिण्याची पाणी, सावलीसाठी शेड, दिव्यांग, वयोवृध्द मतदारांसाठी व्हिलचेअरचीसुध्दा व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व व्यापारी, उद्योजक, डॉक्टरांनी मतदारांना मतदानासाठी अवश्य प्रोत्साहित करावे. आपल्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांना त्या दिवशी सुटी देण्याबरोबरच त्यांना मतदान करण्याबाबत सूचित करावे.

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी मतदानाच्या जनजागृतीसाठी उपस्थित सर्वांनी सहकार्य करावे. तसेच आपल्या अधिनस्त कामगार, कर्मचाऱ्यांना मतदान करण्यास सांगावे. मतदानाच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

यावेळी उपस्थित सर्वांनी लोकशाहीच्या या उत्सवात आनंदाने सहभागी होण्याचे आश्वासन देत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व लोकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याकरीता प्रशासनाला अवश्य सहकार्य केले जाईल, असे सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 8 6 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे