pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

    घाणेवाडी जलाशयातील गाळ उपसण्यास  शुभारंभ लोकसहभागातून सार्वजनिक क्षेत्रातील कामे  करण्याचा जालनेकरांचा गुण अनुकरणीय – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ 

0 1 7 7 7 1

जालना/प्रतिनिधी,दि.1

जालनेकरांचा स्वभाव हा लोकसहभागातून सार्वजनिक क्षेत्रातील अनेक विषयांवरील कामे करण्याचा आहे, हा एक अतिशय सकारात्मक आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी अनुकरण करण्याचा गुण आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयातील गाळ उपसण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते नववर्षाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक आयुष निपोनी, जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, समस्त महाजन ट्रस्ट मुंबईच्या विश्वस्त नूतन देसाई, डॉ.संजय लाखे पाटील, शिवरतन मुंदडा, ओमप्रकाश चितळकर,  डॉ. प्रवीण जेथलिया, डॉ.सोनाली जेथलिया, रमेश देहेडकर, रसना देहेडकर, संजय देशपांडे, अलकेश बगडिया, महानगरपालिकेचे अभियंता संजय वाघमारे, अधिक्षक विजय फुलंब्रीकर, स्वच्छता प्रमुख पवार, भरतभाई शहा, जयकिशन जिंदल, अभिजित कावले, दिपक पंच, अभय सहाणी, देवजीभाई पटेल, गोपाल कावले, योगेश ठक्कर यांच्यासह आसाराम पाटील विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की,  घाणेवाडी जलाशयातून निजामकालीन पाणीपुरवठ्याच्या योजनेतील जालना शहरापर्यंत येणाऱ्या पाईपलाईनच्या नवीन कामास राज्य सरकारने मान्यता देऊन निधी मंजूर केला आहे. हे काम लवकरच पुर्ण होईल. घाणेवाडी तलावाच्या दोन्ही सांडव्याच्या दुरूस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून शासनाकडे तो तात्काळ पाठवण्यात येईल.  यावेळी जालन्यातील लोकसहभागातून सुरु असलेल्या घाणेवाडी तलाव गाळमुक्ती, कुंडलिका सीना पुनरुज्जीवन अभियान, पारसी टेकडी वृक्ष लागवड या सर्व उपक्रमांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक करत या चळवळीतील सर्व सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते नागरिकांचे अभिनंदन केले. समस्त महाजन ट्रस्ट मुंबई, घाणेवाडी जलसंरक्षण मंच आणि कुंडलिका सीना पुनरुज्जीवन अभियान अंतर्गत घाणेवाडी गाळमुक्तीस सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले.
घाणेवाडी तलाव पूर्ण गाळमुक्त  झाल्यास जालना शहराला भविष्यात कधीच पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येणार नसल्याचे घाणेवाडी जलसंरक्षण मंचाचे अध्यक्ष रमेशभाई पटेल यांनी सांगितले. तर सन 2010 पासून घाणेवाडी जलाशयातून गाळ काढण्यासह परिसरातील शेतात तो टाकण्यात येतो, यामुळे संपूर्ण परिसरातील शेतीत रासायनिक खते वापरली जात नाहीत आणि शेतीचे उत्पादन भरपूर येत असल्याबाबत जेष्ठ उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी माहिती दिली. समस्त महाजन ट्रस्ट मुंबईच्या विश्वस्त नूतन देसाई यांच्या सहयोगातून तीन पोकलॅन यंत्र  उपलब्ध  करून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.  या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश केसापूरकर यांनी केले तर आभार उदय शिंदे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे