pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी प्रक्रियेला गती द्यावी – आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे

0 1 7 7 6 4

जालना,प्रतिनिधी,दि. 29

सर्वसामान्यांना आरोग्याच्या सेवा मोफत व अधिक दर्जेदार मिळाव्यात यासाठी शासनामार्फत कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत  राबविण्यात येणाऱ्या आयुष्यमान भारत योजनेतंर्गत पाच लक्ष रुपयांपर्यंत उपचार मोफत स्वरुपात देण्यात येत असल्याने या योजनेच्या माध्यमातून आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी प्रक्रियेला अधिक गती देण्याचे निर्देश आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत डॉ. शेटे बोलत होते. त्यांनी आयुष्यमान भारत/महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक विजय भुतेकर, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या समन्वयक विद्या मस्के आदींसह तालुका आरोग्य अधिकारी, खाजगी रुग्णालय व सीएससी केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आयुष्य भारत मिशन हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, असे सांगून डॉ. शेटे म्हणाले की, प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत आयुष्यमान भारत मिशन हे रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. महाराष्ट्रात अनेक सर्वसामान्य रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के हिस्सा देण्यात येतो. जालना जिल्ह्यात आयुष्यमान भारत कार्डचे वितरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची या कार्डासाठी नोंदणी करावी तसेच स्वस्त धान्य दुकानावर शिधा घेण्यासाठी येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांची कार्डासाठी नोंदणी करावी व पात्र लाभार्थ्यांना कार्डाचे वितरण करावे. हे काम मिशन मोडवर राबविण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात यावे.
जालना येथील शासकीय रुग्णालयात मनुष्यबळाची निकड लक्षात घेता तीन आरोग्य मित्रांची तात्काळ नियुक्ती करावी, अशी सुचनाही डॉ. शेटे यांनी केली. महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रात पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध असल्याने या स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करुन आयुष्यमान भारत कार्ड वितरणाचा दैनंदिन आढावा घेण्यात यावा, असे सांगून आरोग्य मित्र व जिल्हा समन्वयक यांना किमान वेतन मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली.
बैठकीस उपस्थित खाजगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून डॉ. शेटे यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.  आरोग्य मित्र खूप चांगले काम करत असल्याबाबतची माहिती खाजगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी दिली असता खाजगी रुग्णालये या योजनेविषयी समाधानी असल्याने आनंद वाटला असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांनी राष्ट्रीय कार्य समजून अधिकाधिक आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, विकसित भारत संकल्प यात्रेतंर्गत गावागावांत जावून आयुष्मान भारत कार्डची नोंदणी करुन लाभार्थ्यांना कार्ड वितरीत करण्यात येत आहे. दररोज जवळपास दोन हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांची कार्डसाठी नोंदणी करण्यात येत आहे. जालना जिल्हयाच्या शहरी व ग्रामीण भागात कार्ड वितरणास गती देऊन उदिष्ट वेळेत पूर्ण केले जाईल. प्रारंभी विजय भूतेकर, विद्या मस्के यांनी योजनांच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे