pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना जिल्ह्यात 7 ऑगस्टपासून “विशेष मिशन इंद्रधनुष 5.0” लसीकरण मोहिम,- तीन टप्प्यात राबविण्यात येणार मोहिम

लसीकरणापासून वंचित राहिलेले बालक, गरोदर मातांनी लसीकरण अवश्य करुन घ्यावे - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना

0 1 7 7 4 1

जालना/प्रतिनिधी,दि.26

लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालकांचे व गरोदर मातांच्या लसीकरणासाठी जालना जिल्हयात दि. 7 ऑगस्ट 2023 पासून “विशेष मिशन इंद्रधनुष 5.0” ही मोहिम तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. ही मोहिम आरोग्य विभागाने प्रभावीपणे व जबाबदारीने राबवावी. लसीकरणापासून कुणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी,  अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी केली. तर लसीकरणापासून वंचित राहिलेले बालक व गरोदर मातांनी या मोहिमेतंर्गत लसीकरण अवश्य करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी  केले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज  “विशेष मिशन इंद्रधनुष 5.0” अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची बैठक पार पडली. यावेळी श्रीमती मीना बोलत होत्या. बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) कोमल कोरे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन म्हस्के समाज कल्याण अधिकारी डॉ. कांबळे, शिक्षणाधिकारी, ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

बालकांमधील मृत्यु व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. तथापि, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यु पावतात. तसेच केंद्र शासनाने डिसेंबर 2023 पर्यत गोवर रुबेला आजाराचे दूरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यासाठी केंद्र शासनाने माहे ऑगस्ट 2023 पासून तीन फेऱ्यांमध्ये सर्व जिल्हयांमध्ये “विशेष मिशन इंद्रधनुष 5.0” कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेले सर्व बालकं व गरोदर मातांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण केले जाणार आहे.  ही मोहिम आगामी तीन महिन्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.  पहिला टप्प्याचा कालावधी दि. 7 ते 12 ऑगस्ट 2023, दुसऱ्या टप्प्याचा कालावधी दि. 11 ते 16 सप्टेंबर 2023 आणि तिसऱ्या टप्प्याचा कालावधी दि. 9 ते 14 ऑक्टोबर 2023  असा राहणार आहे.

लाभार्थ्यांची निवड — 0 ते 2 वर्ष (0 ते 23 महिने) वयोगटातील लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेल्या बालकांचे सर्व लसीद्वारे लसीकरण करणे. 2 ते 5 वर्ष वयोगटातील ज्या बालकांचे गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल तसेच डीपीटी व ओरल पोलिओ लसीचा बुस्टर डोस राहिला असेल त्यांचे लसीकरण करणे. गर्भवती महिला यांचे लसीकरण करणे आणि दि. 6 ऑगस्ट 2018 किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांचे मोहिमेतंर्गत लसीकरण केले जाणार आहे.

या मोहिमेतंर्गत मोठ्या प्रमाणात झिरो डोस, सुटलेले व वंचित राहिलेले लाभार्थी असलेले क्षेत्र, गोवर आजारासाठी अति जोखमीचे क्षेत्र, नियमित लसी कार्यक्रमातंर्गत नवीन लसीचा समावेश केल्यानंतर कमी काम असलेले क्षेत्र, स्थलांतरीत होणाऱ्या झोपडपट्टया व स्थायी शहरी व शहराला लागून असणाऱ्या झोपडपट्टीचा भाग, गोवर, घटसर्प व डांग्या खोकल्याचे सन 2022-23 या वर्षातील उद्रेकग्रस्त भाग, लसीकरणास नकार देणारे, प्रतिसाद न देणारे क्षेत्र यावर विशेष लक्ष केंद्रीत करुन लसीकरण केले जाणार आहे.  “विशेष मिशन इंद्रधनुष 5.0” या मोहिमेतंर्गत लसीकरण सत्र हे प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र, शाळा येथे आयोजित केले जाणार आहेत. तर अतिदुर्गम व विखुरलेल्या लोकसंख्येकरीता जसे  डोंगराळ भागातील वस्त्या, पाडे या ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून लसीकरण केले जाणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना म्हणाल्या की, “विशेष मिशन इंद्रधनुष 5.0” ही शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी मोहिम आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेले सर्व बालक व गरोदर माता वंचित राहणार, याची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. मोहिमेची मोठया प्रमाणात प्रचार-प्रसिध्दी करावी. शिक्षण विभागाने रॅलीव्दारे जनजागृती करावी. जोखमीचा भाग आणि लसीकरणास नकार देणारे किंवा प्रतिसाद न देणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांना बालक व गरोदर मातांच्या लसीकरणासाठी प्रोत्साहीत करावे. कामानिमित्त आपल्या जिल्हयातून स्थलांतरीत झालेली कुटुंब आणि इतर जिल्हयातून आलेली कुटुंब याची माहिती घेऊन लाभार्थ्यांना लसीकरण करावे. लसीकरण सत्राच्या कालावधीत  लसीचा तुटवडा भासणार नाही, याचीही दक्षता घ्यावी. लसीकरणापासून कुणीही वंचित राहणार नाही, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सुक्ष्म नियोजन करुन मोहिम समन्वयाने व जबाबदारीने यशस्वी करावी.

“विशेष मिशन इंद्रधनुष 5.0” या मोहिमेबद्दल डॉ. जयश्री भुसारे आणि डॉ. गजानन म्हस्के यांनी सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे